अक्षय कुडकेलवार, मुंबई: नुकत्याच राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीमध्ये सत्ता स्थापनेच्या दृष्टीने महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे प्रशासनामध्ये महायुती सरकारच्या नव्या कार्यकाळात सुरुवातीचे 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.
दुसरीकडे शासन दरबारी महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला 100 दिवसात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा आराखडा आखण्याचा विचार सुरु आहे. प्रशासनाकडून त्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंबंधीचे मुख्य सचिवांचे पत्रक सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाले आहे.
नक्की वाचा: भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंचं नाव चर्चेत? काय आहे कारण?
काय आहे पत्रात?
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून विहित प्रक्रियेनंतर नजिकच्या काळात नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. त्या अनुषंगाने, नव्याने नियुक्ती होणाऱ्या शासनाचा १०० दिवसांचा कार्यक्रमाचा कृती आराखडा (Vision Document) तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या संदर्भात मा. मुख्य सचिव लवकरच आढावा घेणार आहेत.
तरी, सामान्य प्रशासन विभागाचा कृती आराखडा विहित करण्यासाठी अपर मुख्य सचिव / प्रधान सचिवं/ सचिव, यांच्या अधिनस्त कार्यासनांची एकत्रित माहिती, Soft / Hard कॉपीत ई-मेलआयडीवर सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात, ही विनंती, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. आता महायुती सुरुवातीचे 100 दिवस कोणता कार्यक्रम राबवणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे, राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये सर्वात महत्वाची माहिती समोर आली असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरुन दावा सोडला आहे. मोदी- शहा जो निर्णय घेतील, तो मान्य असेल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु भाजपकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाची बातमी: शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला, मोदी- शाहांचा निर्णय मान्य करणार