जाहिरात

Jayant Patil : 'यासाठीच मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करलं होतं का?' महाराष्ट्र दिनानिमित्त जयंत पाटलांचं भावनिक पत्र

जयंतराव पाटील यांनी आपल्या पत्रात सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले असताना राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडतील का ? हा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे.

Jayant Patil : 'यासाठीच मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करलं होतं का?' महाराष्ट्र दिनानिमित्त जयंत पाटलांचं भावनिक पत्र

आज 66 वा महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी कित्येकजण हुतात्मा झाले. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. सोशल मीडियावरही महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पत्र शेअर केलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यामध्ये सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावरही भाष्य करण्यात आले आहेत. सध्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतील का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक भावनिक पत्र प्रसिद्ध केले आहे. ज्यात ते म्हणालेत की, मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. 
 

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचं महाराष्ट्र दिनानिमित्ताने सविस्तर पत्र...
 

माझ्या प्रिय महाराष्ट्र वासियांनो,

आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन! भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिती केली जात होती. परंतु भारत सरकारने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरून मराठी-जनात क्षोभ उसळला. यातून प्रचंड तीव्र आंदोलन आणि मोठा लढा उभा झाला, शेवटी 1960 साली स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला.

Ashadhi Wari: आषाढी वारीचं वेळापत्रक आलं! माऊलींच्या पालखीचं प्रस्थान कधी? वाचा डे टू डे आषाढी वारी

नक्की वाचा - Ashadhi Wari: आषाढी वारीचं वेळापत्रक आलं! माऊलींच्या पालखीचं प्रस्थान कधी? वाचा डे टू डे आषाढी वारी

स्व. यशवंतराव चव्हाण म्हणाले त्याप्रमाणे हा 'सोनियाचा दिवस' आपल्याला सहज मिळाला नाही, तर त्यासाठी तब्बल 106 हुतात्मांनी आपले बलिदान दिले. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर 21 नोव्हेंबर 1956 साली झालेल्या मोर्चाचे देता येईल. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला. तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा विरोध करण्यासाठी कामगारांचा विशाल मोर्चा फ्लोअरा फाऊंटन येथे पोहोचला. जमावबंदी, पोलिसांचा लाठीचार्ज अशा कोणत्याही कारवाईने मोर्चा आटोक्यात आला नाही. म्हणून शेवटी मोर्चा चिरडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले आणि अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. हे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, मुंबई, महाराष्ट्र आणि माय मराठीसाठी तिच्या लेकरांनी प्राणांची आहुती दिली तेव्हा मराठी देश स्थैर्य प्राप्त करू शकला आहे.

यंदा महाराष्ट्र राज्य आपला 65वा स्थापना दिन साजरा करत आहे. गेल्या 65 वर्षात महाराष्ट्राने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, औधोगिक, शैक्षणिक या सर्व स्तरांत उत्तुंग कामगिरी केली. पण मधल्या काळात महाराष्ट्राची प्रचंड पिछेहाट झाली आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या अब्रूवर हात टाकला जात आहे, पाण्यासाठी लोकांना जीव गमवावा लागत आहे, शेतकरी हवालदिल होऊन आपले प्राण त्यागत आहे, राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर 'हिंदी'चे भूत बसले असल्याने आपल्याच घरात 'मराठी' हाल सोसत आहे. आपलेच परक्यांसोबत बसून महाराष्ट्राच्या वाटाघाटी करत असतील तर दुसरे काय होणार?

आता हे कुठपर्यंत सहन करायचे? यासाठीच मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करले होते का? होत्याचं नव्हतं झालं तर येणा-या पिढीला आपण काय उत्तर देणार? मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.

दरम्यान जयंतराव पाटील यांनी आपल्या पत्रात सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले असताना राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडतील का ? हा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: