
राहुल कुलकर्णी
आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, या सोसायटीमध्ये राहणाऱ्या 85 वर्षांच्या महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कार करणारा आरोपी 23 वर्षांता आहे. सोमवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव ओम जयचंद पुरी (23, सध्या रा. हिंजवडी, मूळगाव वाकडी, ता. कळंब, जि. धाराशिव) आहे. त्याला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नक्की वाचा : DJ चा दणका! चार तास DJ समोर थांबला, घरी गेल्यावर बहिरा झाला, डॉक्टर म्हणाले...
पीडित वृद्ध महिला आपल्या सोसायटीतील पाचव्या मजल्यावर चालत असताना आरोपीने तिला लक्ष्य केले. सोसायटीमध्ये दुरुस्ती कामासाठी आलेल्या ओमने मजल्यावर कोणीही नसल्याचे पाहून त्याने वृद्धेचे तोंड दाबले. त्यानंतर तिला जिन्यातून सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या मोकळ्या जागेत नेले. ओमने या वृद्धेवर तिथे बलात्कार केला. या घटनेदरम्यान वृद्धेचा गळा दाबून तिला मारहाणही करण्यात आली. पीडितेने प्रतिकार केला आणि आरडाओरडा केला, ज्यामुळे आरोपी पळून गेला. पीडितेने घरी जाऊन हा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या 57 वर्षीय मुलीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार दिवसांपूर्वी आरोपी सोसायटीमध्ये काम करण्यासाठी आलेला असल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. सीसीटीव्ही दृश्ये तपासल्यानंतर आरोपीचा माग काढणे पोलिसांना शक्य झाले. पोलिसांनी ओम पुरी याला अटक केली असून त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नक्की वाचा: सून चार महिन्यांची गर्भवती, सासुचं धक्कादायक पाऊल; तरुणीच्या मृत्यूने इंदापूर हादरलं!
या घटनेमुळे हिंजवडी परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर समस्या बनला आहे. वृद्ध महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील आरोपींवर कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई केली असली तरी, समाजातील अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापक उपाययोजना आवश्यक आहेत अशी मागणी केली जात आहे.