
आशिष भार्गव
गेटवे ऑफ इंडियाजवळ रेडियो क्लब इथे जेट्टी उभारण्याला तिथल्या स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. या जेट्टीला विरोध करत तिथल्या काही स्थानिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी याचिकाकर्त्यांचे कान टोचले.
सरन्यायाधीशांनी ठेवले मानसिकतेवर बोट
मुंबईतील प्रसिद्ध अशा गेट वे ऑफ इंडियाजवळ असलेल्या रेडियो क्लब इथे नवी जेट्टी बांधण्याचे प्रस्तावित आहे. प्रवासी वाहतुकीसाठी उपयुक्त असलेल्या या जेट्टीला काही स्थानिकांनी बराच विरोध केला आहे. या जेट्टीवरून तिथल्या स्थानिकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सदर प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शालजोडीतले हाणत कान टोचले. सरन्यायाधीशांनी या याचिकेवर बोलताना आमची मुंबई आणि त्यांची मुंबई यातला नेमका काय फरक आहे नीटपणे समजावून सांगितले. दक्षिण मुंबईत राहणारे आणि उपनगरे तसेच त्यापलिकडे राहणाऱ्यांची नेमकी मानसिकता काय असते यावरच सरन्यायाधीशांनी बोट ठेवले आहे.
नक्की वाचा : Income Tax रीटर्न फाइल करण्याची मुदत वाढवली, काय आहे नवी मुदत?
आमची मुंबई मालाड, ठाणे, घाटकोपरला राहाते!
सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी या याचिकेच्या सुनावणीदरम्यान म्हटले की, "आमची मुंबई" ही कुलाब्यात राहात नाही. "त्यांची मुंबई" ही कुलाबा आणि आसपासच्या परिसरात राहाते. "आमची मुंबई" मालाड, ठाणे, घाटकोपर भागात राहाते. सरन्यायाधीशांनी केलेला "आमची मुंबई आणि त्यांची मुंबई"चा उल्लेख हा मुंबईच्या विविध भागांमध्ये राहणाऱ्यांची मानसिकता कशी असते यावर बोट ठेवणारा आहे. खरंतर हा उल्लेख जेट्टीला विरोध करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर युक्तिवाद करणाऱ्या एका वरिष्ठ वकिलाने आमची मुंबई आणि त्यांची मुंबई असा उल्लेख केला होता. सरन्यायाधीशांना मुंबई, महाराष्ट्राची बारकाईने माहिती असल्याने त्यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना दुरुस्त करत या वकिलांनी वापरलेल्या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे हे समजावून सांगितले.
नक्की वाचा :राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे 10 निर्णय, वाचा एका क्लिकवर
कोस्टल रोडचा केला उल्लेख
याचिकेवरील सुनावणी करताना म्हटले की, प्रत्येकाला सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प हवा असतो, मात्र तो आपल्या अंगणात नसावा तो दुसरीकडे असावा अशी मानसिकता असते. मुंबईमध्ये एखादी चांगली गोष्ट व्हायला लागली की सगळेजणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतात. कोस्टल रोडचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, "तुम्हाला कोस्टल रोडचे महत्त्व आता कळाले असेल." पूर्वी वर्सोव्यावरून दक्षिण मुंबईत पोहोचायला 3 तास लागायचे मात्र आता कोस्टल रोडमुळे हे अंतर अवघ्या 40 मिनिटांत गाठता येते.
सरन्यायाधीशांनी म्हटले की विविध शहरांमध्ये अशी विकासकामे केली जात आहे. जगभर अशी कामे सुरू असतात. मायामीला गेलात तर अशी अनेक कामे सुरू असल्याचे तुम्हाला दिसेल. हे शाब्दीक ताशेरे मारल्यानंतर सरन्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने जेट्टीच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली. सदर प्रकरण हे मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असून पावसाळ्यानंतर या प्रकरणाचा निवाडा होईल असे खंडपीठाने म्हटले आहे. ही याचिका क्लीन अँड हेरीटेज कुलाबा रेसिडेंट असोसिएशनने दाखल केली होती. यामध्ये कुलाब्यातील जवळपास 400 नागरिकांचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world