Mumbai News : मुंबईतून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील दोन चोरटे गुन्हा केल्यानंतर थेट शिर्डीला जाऊन साईबाबाच्या चरणी नतमस्तक होत असल्याचं समोर आलं आहे. ही चोर मंडळी दुकान फोडायचे...चोरी करायचे आणि चोरी केलेला मुद्देमाल घेऊन थेट शिर्डी गाठायचे. विशेष म्हणजे चोरीच्या मालातील काही भाग साईबाबांच्या चरणी दान करायचे.
काय आहे नेमकं प्रकरण?
रोहित खांडागळे (१९) आणि आदित्य प्रसाद (१९) ही दोन चोर मंडळी चोरी करून शिर्डीच्या चरणी दान करीत असल्याचं समोर आलं आहे. काळाचौकी पोलिसांनी या दोन चोरट्यांना अटक केली आहे. चोरी केल्यानंतर हे दोघे साईबाबा मंदिर परिसरात आश्रय घेऊन चोरलेल्या पैशातील काही भाग मंदिरात दान करायचे, अशी कबुली चोरट्यांनी दिली आहे.
या चोरट्यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे शिवडी येथील राम टेकडी परिसरातील निरंकार जनरल स्टोअर फोडलं होतं. सकाळी मालकाने दुकान उघडलं तर चोरी झाल्याचं समोर आलं. ड्राव्हरमधील ३३ हजार रुपयांची रोकड गायब होती. याप्रकरणी १० वाजता काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दोन संशयित तरुण कॅमेऱ्यात कैद झाले होते. अधिक चौकशीअंती दोघेही सराईत चोर असल्याचं उघड झालं. त्यानंतर मोबाइल सर्व्हेलन्सच्या आधारे पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला. यावेळी चोरांचं लोकेशन शिर्डीत असल्याचं समोर आलं. शिर्डीतील पोलिसांशी संपर्क साधून सापळा रचून साईबाबा शिर्डी संस्थानच्या कॅन्टीनमधून दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.