Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यवस्ती भागात भरदिवसा झालेल्या गोळीबारात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक ७, पूर्णवाद नगर परिसरात आज दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. पंचवीस वर्षीय शुभम यादव या युवकावर दबा धरून बसलेल्या २ ते ३ अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
जुन्या वादातून गोळीबार झाल्याची शक्यता
शुभम यादव यांच्या पोटात ही गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या घटनेमागील नेमकं कारण काय, याचा तपास पोलीस करत असून विविध चर्चांचीही पडताळणी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे श्रीरामपूर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world