
सुनील दवंगे, शिर्डी: जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे शिर्डीचे साईबाबा. भारतासह भारताबाहेरील भाविकही शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. या भक्तांकडून साईचरणी भरभरुन दानही केले जाते. रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने तसेच आकर्षक भेटवस्तूंच्या रुपात भाविक साईचरणी आपले दान देत असतात. सध्या दुबईहून आलेल्या एका साईभक्ताने तब्बल 24 लाखांचे सोन्याचे नाव साईचरणी अर्पण केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देशात सोन्याचे दर सध्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले असून ते प्रतितोळा लाखाच्या घरात पोहोचलेय.. अशा स्थितीतही शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी सोन्याचं दान वाहण्याची भक्तांची श्रद्धा वाढत चालल्याच दिसून येत आहे. नुकतेच दुबईहून आलेल्या एका साईभक्ताने साईबाबांच्या चरणी विशेष दान अर्पण केलं आहे.
तब्बल 270 ग्रॅम वजनाचं आणि आकर्षक नक्षीकाम असलेलं सोन्यातील “ॐ साई” हे नाव, या भक्ताने शिर्डी संस्थानकडे सुपुर्द केलंय. या सुवर्णदानाची किंमत सुमारे चोवीस लाख रुपये असून, दान देणाऱ्या भक्ताने आपली ओळख गुप्त ठेवली आहे. सुवर्ण “ॐ साई” अक्षरांचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. त्यानंतर हे सुवर्ण “ॐ साई” द्वारकामाईमध्ये बाबा आपल्या हयातीत ज्या ठिकाणी उभे राहत त्या ठिकाणी लावण्यात आले आहे.
नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
दरम्यान, भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साईबाबा मंदिराची सुरक्षा अधिक बळकट करण्यात आली असून रविवार पासून फुलं, हार आणि प्रसाद तसेच मोबाईल साई मंदिरात नेण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे. रविवारपासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world