रात्री पावणे अकराच्या सुमारास राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत. ही बैठक पूर्वनियोजित होती असे सांगण्यात आले आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या विषयांसंदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारने दणक्यात शुभारंभ केला होता. अजित पवार यांनी जन्मसन्मान यात्रेद्वारे या योजनेचा प्रचार प्रसार जोरात केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या योजनेसाठी राज्याच्या विविध भागांमध्ये जाऊन प्रचार केला. महायुतीने एकत्रपणे या योजनेचा शुभारंभ केला होता. या योजनेमुळे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या वेळी तयार झालेलं वातावरण फिरेल असे महायुतीला वाटत असतानाच बदलापुरातील हादरवणारी घटना घडली. या घटनेनंतर सरकारविरोधातील रोष वाढू लागला असून विरोधक या रोषाचे संधीत रुपांतर करण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या बैठकीमध्ये यासंदर्भातही चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नक्की वाचा:बदलापूर प्रकरणानंतर प्रशासनात मोठा बदल
जागावाटपाची चर्चा तिघांमध्येच
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप कसे असावे याची चर्चा महायुतीच्या या तीन प्रमुख नेत्यांमध्येच होत आहे. जितकी जास्त लोकं तितकी चर्चा वाढत जाते आणि त्यातून वादाचे प्रसंग ओढावतात असा अनुभव आल्याने या तीन नेत्यांनी आपापसात बसून जागावाटप निश्चित करावे असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हे तीन नेते एकत्र बसून यासंदर्भातील चर्चा करत असून अंतिम निर्णय आपापल्या पक्षातील इतर नेत्यांना कळवतील असे निश्चित झाले आहे.
नक्की वाचा:बदलापूरच्या असंवेदनशील महिला पोलीस अधिकाऱ्याला आणखी एक दणका
महाराष्ट्र 'बंद' संदर्भात चर्चा?
24 तारखेला बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बंदची हाक दिली आहे. हा बंद राजकीय स्वरुपाचा नाही असेही ठाकरेंचे म्हणणे आहे. या बंदला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. बदलापुरातील प्रकरणानंतर लोकांमध्ये रोष असून या बंदला चांगला प्रतिसाद मिळेल अशी शिवसेना उबाठाला अपेक्षा आहे. महायुतीच्या नेत्यांनी 20ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनावर टीका करताना विरोधक या गंभीर मुद्दावरूनही राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. बदलापुरातील आंदोलन पेटवण्यामागेही विरोधकांचा हात असावा असे आरोप महायुतीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.