Ajit Pawar Funeral Update: बारामतीमध्ये अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर तिथली परिस्थिती आणि डॉक्टरांचा सल्ला लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार यांचे पार्थिव पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून ते रात्रभर तिथेच ठेवले जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः समोर येत याबद्दलची अधिकृत माहिती दिली आणि कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे कारण?
अजित पवार यांचे पार्थिव बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. वेळ निघून जात असताना ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली.
( नक्की वाचा : Ajit Pawar : अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपात? चर्चा सुरू होताच शरद पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांचंही उत्तर )
ही परिस्थिती पाहून पोलीस प्रशासन आणि डॉक्टरांनी कुटुंबाला काही सूचना दिल्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पार्थिव जास्त वेळ बाहेर ठेवणे योग्य नसल्याने ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, रात्रभर पार्थिव हॉस्पिटलमध्ये असेल. या निर्णयामुळे कुणाची गैरसोय झाली असेल तर त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनीही उपस्थित जनसमुदायाला शांतता राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कधी होणार अंत्यसंस्कार?
अजित पवार यांच्यावर उद्या (गुरुवार, 29 जानेवारी 2026) अंतिम संस्कार केले जाणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा एकदा सर्वांना अंत्यदर्शनासाठी संधी दिली जाईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता अंत्यविधीची प्रक्रिया पार पडेल. प्रशासनाकडून आता याबाबतचे नियोजन केले जात आहे जेणेकरून गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल आणि सर्वांना दर्शन घेता येईल.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death : अजित पवारांच्या मृत्यूनंतर 5 बदल अटळ, फडणवीस ते शरद पवार सर्वांची कशी वाढणार डोकेदुखी ? )
कशी घडली ही भीषण दुर्घटना?
अजित पवार यांचा मृत्यू एका भीषण विमान अपघातात झाला. बुधवारी सकाळी 8:48 च्या सुमारास व्हिएसआर एव्हिएशन या खासगी कंपनीचे बॉम्बार्डियर लिअरजेट 45 हे विमान मुंबईहून बारामतीसाठी निघाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आपल्या गावी जात होते. मात्र, बारामतीमध्ये उतरण्यापूर्वी धावपट्टीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हे विमान उघड्या शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक, एक सहाय्यक आणि दोन क्रू मेंबर्स अशा एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. डीजीसीएने या घटनेचा प्राथमिक अहवाल दिला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world