संजय तिवारी नागपूर: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तब्बल 41 जागा जिंकल्या तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त १० जागा मिळाल्या. या विजयाने काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत अजित पवार यांनी बाजी मारली आहे.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी बाजी मारल्यानंतर आता शरद पवार यांचे विजयी तसेच पराभूत उमेदवारही तुतारीची साथ सोडून घड्याळ हाती बांधणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्या आमदारांना फोडण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आता नागपुरमध्ये झळकलेल्या एका बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
नक्की वाचा: स्थिर सरकारचा होणार महाराष्ट्राला फायदा, शेअर मार्केटमधील तेजीचा अर्थ काय?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी गृ७मंत्री अनिल देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला. अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देशमुख यांच्या घरासमोर जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार, अजितदादा. तुतारीच्या त्या 10 आमदारांचेही अजित दादाच वाली, असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला आहे. तसेच आता त्या दहा जणांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, एकत्र आलो तर फरक पडेल, स्थिती बळकट होईल, असेही नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा जागी विजय मिळवता आला आहे, या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादी अजित दादा गटाचे कार्यकर्त्यांनी एक महत्त्वाची घोषणा दिली आहे.. राष्ट्रवादीचे खरे वारसदार आता अजितदादा हेच असून तसा मतदारांनी कौल दिला आहे, आता त्या दहा जणांनी निर्णय घ्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू झाला आहे. नागपूर जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांनी कार्यकर्त्यांच्या वतीने त्या दहा जणांचे स्वागत असेल, फक्त त्यांनी निर्णय घ्यावा असे एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना सांगितले आहे.
महत्वाची बातमी: निवडणुकीत भोपळा, आता इंजिनही जाणार? राज ठाकरेंच्या मनसेचं काय चुकलं?