देवा राखुंडे, बारामती:
Laxman Hake Morcha Baramati: बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज सलग्न रुग्णालयाला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव दिल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले असताना अजित पवारांचे नाव कशासाठी? असा सवाल हाकेंनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज लक्ष्मण हाके हे बारामतीमध्ये मेडिकल कॉलेजवर निषेध मोर्चा काढणार आहेत, शासनाने हा जीआर रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अजित पवारांच्या नावाला लक्ष्मण हाकेंचा विरोध
राज्य सरकारने बारामती मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय सलग्न असणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयाला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव दिले आहे, याविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके निषेध मोर्चा काढणार आहेत. यासाठी आज ते बारामती दौऱ्यावर असून स्थानिक धनगर समाजातील कार्यकर्त्यांसोबत लक्ष्मण हाके या वैद्यकीय महाविद्यालयवर निषेध मोर्चा काढणार आहेत. सकाळी दहा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसशी सलग्न असणारे काही धनगर समाजातील नेते मात्र या नावाला समर्थन दर्शवत आहेत,शासनाने वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे दिलेले आहे ते बदलले नाही,ते नाव कायम ठेवून महाविद्यालयांशी सलग्न असणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयाला अजितदादांचे नाव दिले आहे,सरकारने धनगर समाजावर कुठेही अन्याय केला नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडित असणाऱ्या धनगर समाजातील काही नेत्यांचं म्हणणं आहे.
बारामतीत काढणार निषेध मोर्चा
"बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारने यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयाशी सलग्न असणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयाला देखील तेच नाव ठेवा. दिवंगत नेते अजित पवार यांचं नाव देण्याचा घाट कशासाठी ? बारामती मध्ये अनेक संस्था आहेत, ज्याला दिवंगत नेते अजित पवार यांचे नाव देऊ शकता मात्र याच ठिकाणी नाव देण्याचा घाट कशाला?" असा प्रश्न लक्ष्मण हाके यांच्यासह धनगर समाज बांधवांकडून विचारला जातोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world