राज्यातील अनेक ठिकाणी शेतकरी वर्गाला अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. आज सायंकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यातल्या गावांना अवकाळी पावसाने चांगलंचं झोडपून काढलं. याशिवाय अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना वादळीवाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाचा सामना करावा लागला. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापुर आणि अकोला तालूक्यात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला . तर पातुर तालुक्यातल्या मळसुर भागात गारपीटीसह जोरदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली. या गारपीट आणि अवकाळीमुळे आंबा, लिंबू , टरबुज आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सलग अर्धा ते पाऊन तास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस सुरू होता. पावसामुळे शेत-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
अमरावती जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाचा सामना करावा लागला. आज सकाळी चांदूर बाजार प्रेस गावात अवकाळी पावसाने व गारपिटीमुळे संत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे संत्र व कापणीला आलेल्या गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
पातुरातील मळसुर भागात जोरदार पावसासह गारपीट झाली. या पावसामुळे आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकाचं नुकसान झालं आहे तर दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. याशिवाय अकोला शहरात देखील वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अकोला शहरात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडला. तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तेल्हारा तालुक्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतातील गहू, ज्वारी, मका, आंबा, केळीसह आदी फळबाग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता.
शेतकरी हतबल
आता पुन्हा एकदा विदर्भातला शेतकरी अवकाळी पावसामुळे हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करावेत आणि मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान राज्यातील काही भागात पुढील काही दिवस तरी पाऊस, ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचा चटका राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जात आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.