
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
मध्यप्रदेशात मुस्कान रस्तोगी नावाच्या एका महिलेने आपल्या पतीची हत्या करून त्याचे तुकडे ड्रममध्ये भरले आणि त्यानंतर आपल्या प्रियकरासोबत पिकनिकला गेली. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली होती. पती-पत्नीमधील प्रेमाच्या नात्यात इतकी कटूता येऊ शकते असा विचारही कोणी करू शकत नाही. दरम्यान अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने स्टेटस ठेवत आपलं आयुष्य संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे पतीने आपल्या सुसाइड नोटमध्ये मृत्यूनंतर पत्नीला आपला चेहरा दाखवू नका अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाअंतर्गत कार्यरत पटवारी (तलाठी) शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 'व्हाट्सअप'वर स्टेटस ठेवून तेल्हारा येथील एमआयडीसीमध्ये त्यांनी गळफास घेतल्याची माहिती आहे. पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्यांनी 'स्टेट्स'मध्ये नमूद केलं आहे. पत्नीकडून आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचं आरोप त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये केला आहे. एकेकाळी आपल्या पत्नीसाठी कविता लिहिणाऱ्या शिलानंद यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असा सवाल उपस्थित होत आहे.
नक्की वाचा - Crime News : झोपेतच पत्नीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, एक चूक अन् सुखी संसाराची राख रांगोळी !
स्टेटसमध्ये काय लिहिलंय?
त्यांनी स्टेटसमध्ये दिल्यानुसार, पत्नीच्या भावाला शेतीसाठी पैसे हवे होते. यासाठी शिलानंद यांनी स्वत:च्या नावावर कर्ज काढलं होतं. मात्र प्रत्यक्षात पत्नीच्या भावाने हे हफ्ते फेडण्यास नकार दिला. त्यामुळे पतीला दरमहिना व्यासासह याचे पैसे द्यावे लागत आहे. याशिवाय पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. पत्नी अश्लील शिवीगाळ करते. गेल्या पाच दिवसांपासून मी जेवण केलं नसल्याचं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलं आहे. माझ्या मृत्यूनंतर कोणीही माझा चेहरा पाहिला तरी चालेल पण पत्नीला दाखवू नका, मृत्यूपूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे. असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलं आहे.

शिलानंद यांना एक मुलगा एक मुलगी आहे. फेरफार प्रणाली मध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे काही काही वर्षांपूर्वी शिलानंद तेलगोटे यांचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शिलानंदाचा प्रमाणपत्र देऊन सत्कारही केला होता. शिलानंद तेलगोटे अकोट येथील रहिवासी असून तेल्हारा तहसील कार्यालयात कार्यरत होते. 12 मार्च रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो, चार वर्षांपूर्वी त्यांनी एक फेसबुक पोस्ट करून आपल्या पत्नीसाठी कविताही टाकली होती.

* साथीदार जेव्हा सोबत असतो, तेव्हा प्रवास छानच होतो.आपल्या प्रवासाच्या सुरुवातीचा
* साक्षीदार असलेला हा दिवस अविस्मरणीय राहो, आनंदाचा हा क्षण तुला वारंवार जगता येवो.
* लग्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world