योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Election News Today : अकोला महापालिका निवडणुकीच्या मतदानाला फक्त एक दिवसांचा कालावधी उरला असतानाच मोठी खळबळ उडाली आहे. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुन्या पारस्कर शोरूमजवळ खदान पोलिसांनी तब्बल 50 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. एका दुचाकीस्वाराकडून ही रक्कम जप्त करण्यात आली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अकोल्यात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
हे पैसे कोणाचे आहेत? पैसे कुठून आणण्यात आले?
सूत्रांकडून पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत संशयास्पद दुचाकीस्वाराला थांबवले. तपासणीदरम्यान दुचाकीवर असलेल्या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. संबंधित व्यक्ती या रकमेबाबत समाधानकारक माहिती देऊ शकलेली नाही, असं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीस्वाराला ताब्यात घेत 50 लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. हे पैसे कोणाचे आहेत? पैसे कुठून आणण्यात आले? पैसे कुठे नेण्यात येणार होते? याचा सखोल तपास सुरु आहे.
नक्की वाचा >> मतदानाआधीच झोप उडवणारा व्हिडीओ, नवी मुंबईच्या CBD बेलापूरमध्ये खळबळ,उमेदवारांची धाकधूक वाढली
निवडणूक प्रलोभन की व्यावसायिक व्यवहार?
ही रोकड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी आणण्यात आली होती की ती कोणत्या व्यापाराशी संबंधित व्यवहारासाठी होती?याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.परंतु, मतदानाच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून,आयकर विभागालाही याची माहिती देण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास खदान पोलीस करत असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा >> Viral Video : शाळेतील मुलांच्या डब्यात मॅगी अन् चिप्स..व्हिडीओ पाहताच लोक पालकांवर भडकले, "फक्त आईलाच दोष.."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world