जाहिरात

Beed News: सोन्यापेक्षाही महाग! बीडमध्ये 1.5 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त

'अंबर ग्रीस' हा व्हेल माशाच्या आतड्यांमध्ये तयार होणारा एक मेणचट पदार्थ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला प्रचंड मागणी आहे.

Beed News: सोन्यापेक्षाही महाग! बीडमध्ये 1.5 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त

आकाश सावंत, बीड

बीड शहरात सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची म्हणजेच अंबर ग्रीसची तस्करी करण्याचा प्रयत्न शिवाजीनगर पोलिसांनी हाणून पाडला आहे. चऱ्हाटा फाटा येथे एका कारमधून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दीड कोटी रुपयांच्या जवळपास किंमत असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे दोघे जण बीड शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक बांगर यांच्या पथकाने त्वरित कारवाईचे नियोजन केले. शहरानजीकच्या एका हॉटेलजवळ, चऱ्हाटा फाटा येथे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागण्यापूर्वीच सापळा यशस्वी झाला आणि या दरम्यान दोघांना तातडीने ताब्यात घेण्यात आले.

(नक्की वाचा-  पुणे-छत्रपती संभाजीनगर 8 तासांचा प्रवास 3 तासांवर येणार; 'या' शहरांना होणार मोठा फायदा)

जप्त केलेला 'अंबर ग्रीस'

या कारवाईत शैलेंद्र प्रभाकर शिंदे आणि विकास भीमराव मुळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या दोघांकडून अंदाजे दीड किलो वजनाची व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त केली आहे. या जप्त केलेल्या 'अंबर ग्रीस'ची अंदाजित किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे.

व्हेल माशाच्या उलटीचा वापर कशासाठी?

'अंबर ग्रीस' हा व्हेल माशाच्या आतड्यांमध्ये तयार होणारा एक मेणचट पदार्थ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला प्रचंड मागणी आहे. याचा उपयोग अत्यंत महागड्या परफ्यूममध्ये सुगंध टिकवून ठेवण्यासाठी फिक्सेटिव्ह म्हणून केला जातो. तसेच काही पारंपरिक औषधे आणि अॅफ्रोडिसियाक म्हणूनही याचा वापर केला जातो. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत व्हेल माशाची उलटी बाळगणे आणि विकणे बेकायदेशीर आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या उलटीची वनविभागाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. आता पुढील आणि अधिकृत तपासणीसाठी हा मौल्यवान अंबर ग्रीस नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. पकडलेल्या दोन्ही आरोपींवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस आणि वन विभाग कसून तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com