दिल्ली: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोर- बैठका सुरु आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये खाते वाटपांवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा अंतिम फॉर्म्युला आता समोर आला आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये सुरु असलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत तोडगा काढला असून मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही जवळपास निश्चित झाली आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 20 शिवसेना शिंदे गटाला 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10 जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नक्की वाचा - बसमध्ये बिघाड नाही, चालकानं मद्यपान केलं नव्हतं; कुर्ला डेपोजवळच सुरू झालं होतं अपघाताचं सत्र?
दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा हा फॉर्म्युला फायनल करण्यात आला आहे. त्याचबरोबर 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशीही माहिती समोर आली आहे. या फॉर्म्युल्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आता खाते वाटप कसे होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तत्पुर्वी, 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले होते की, महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. महाराष्ट्रात 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.
दरम्यान, महायुतूीमध्ये अनेक महत्वाच्या खात्यांवरुन रस्सीखेच होण्याचीही शक्यता आहे. गृहमंत्रीपद, गृहनिर्माण, महसूल, सामान्य प्रशासन, कायदा व न्यायव्यवस्था, ग्रामविकास, वीज, पाणी, आदिवासी कल्याण, ओबीसी आणि तंत्रशिक्षण आदी खाती भाजप स्वत:कडे ठेवू शकते. तर शिवसेनेच्या वाट्याला नगरविकास, शालेय शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आदींचा समावेश असू शकतो. तर राष्ट्रवादीला अर्थ, कृषी आणि महिला व बालकल्याण ही खाती मिळू शकतात.
नक्की वाचा - New RBI Governor : रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर Sanjay Malhotra कोण आहेत?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world