शुभम बायास्कार, अमरावती
Amravati Crime: चिकन खाण्याच्या वादातून बारा वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. मावस भावानेच किरकोळ वादातून ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच हा घातपात नसून अपघात असल्याचे भासवत खोटी तक्रार दिल्याने मुलाच्या पित्यालाही आरोपी करण्यात आले आहे.
चिकनच्या पीसवरुन वाद...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावतीच्या भातकुली येथे चिकन खाण्याच्या वादातून मावस भावानेच आपल्या 12 वर्षीय भावाची लोखंडी वस्तूने वार करत घरातच त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुरुवातीला अपघाताचा बनाव करून अपघाताची खोटी तक्रार देण्यात आली होती, मात्र पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा उलगडा केला.
जितेराजा गौड वय 12 वर्ष असे मृतक बालकाचे नाव आहे, तर बब्बू गौड वय वर्ष 21 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृतक आणि आरोपी हे मध्यप्रदेशचे असून ते कामासाठी भातकुली तालुक्यात आले होते, मृतक मुलाच्या वडिलांनी अपघाताची खोटी तक्रार दिली असल्याने त्यांना सुद्धा यात आरोपी करण्यात आले आहे.
भावानेच केली भावाची हत्या
मुलगा आणि पुतण्या पाणी आणण्यासाठी बाहेर गेले होते, त्यावेळी अज्ञाताने त्यांना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, अशी तक्रार मृताच्या वडिलांनी दिली होती. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कुटुंबातील एकेकाची चौकशी केली. या चौकशीतून ही हत्या किरकोळ वादातून झाल्याचे समोर आले. आरोपीचे आई वडील घरी नव्हते, त्यामुळे तो आपल्या काकाच्या घरी जेवत होता.
यावेळी चिकनचे पीस कमी आहेत, यावरुन दोन्ही भावांमध्ये भांडणे झाली. आरोपी बब्बू गौड याने जितेराज गौड याच्यावर हल्ला करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. तसेच त्याने स्वतःवरही वार केले. या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या तपासात सर्व सत्य समोर आले.याप्रकरणी दोघांवर आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world