
शुभम बायस्कार, अमरावती: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात मतदार यादीतून चक्क 28 गावे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शशिकांत मंगळे यांच्या तक्रारमधून सर्व प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. वेळीच दखल घेतली गेल्याने 28 गावातील 8 हजार मतदारांना मतदान करण्याची संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. एकाच तालुक्यात मतदार यादीत 28 गाव गायब झाल्याने जिल्ह्यातील सर्व मतदार याद्या तपासण्यात याव्यात आणि गट आणि गण निहाय मतदार याद्या चूक दुरुस्ती करून प्रसिद्ध कराव्यात अशी मागणी शशिकांत मंगळे यांनी केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने प्रसिद्ध प्रारूप याद्या या ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्याची गरज होती. त्यामुळे गावातच मतदार यादीत आपले नाव तपासण्याची संधी मतदाराला मिळाली असती. मात्र यादी प्रसिद्ध झाली नाही त्यामुळे गावातील नागरिकांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. मतदारांमध्ये यादीत नाव नसल्याने भीती निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाला सोबत घेऊन हा रचलेला कट आहे. त्यामुळे पुन्हा प्रारूप यादी प्रसिद्ध करून आक्षेप नोंदवण्याची मुभा द्यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे.
Thane Political News: एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपची 'फिल्डिंग'; स्वबळावर लढण्याचे संकेत
मतदार यादीतून 28 गावे गायब
जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बच्चू कडू देखील आक्रमक झालेत. या अगोदर मतदार यादीतील नाव गायब व्हायचे, मात्र आता गाव गायब झाल्याची बाब उघडकीस आली आहे. निवडणूक आयोगाची ही गंभीर बाब आहे.. लोकशाही नावाची गोष्ट संपत चालली आहे आणि राजेशाहीकडे वाटचाल दिसत आहे. लोकशाहीतून हुकूमशाही कडे चालविण्याचा प्रकाराचा आम्ही निषेध करतो.. निवडणूक आयोगाने याच स्पष्टीकरण द्यायला पाहिजे असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.
या सर्व प्रकारावर निवडणूक विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. काही टेक्निकल अडचणीमुळे काही यादी भाग अपलोड झाला नाही. जे यादी भाग सुटले त्याचे पुन्हा चार्ट तयार करून अपलोड करण्यात येत आहे. त्यामुळे कुठलाही मतदार यातून सुटणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. त्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे अशी प्रतिक्रिया निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी दिली आहे.
(नक्की वाचा: Pune News: पुरंदर एअरपोर्ट वादात आता शरद पवारांची उडी, केलं मोठं वक्तव्य)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world