शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News : विदर्भातील शैक्षणिक क्षेत्राचे केंद्र असलेल्या अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेत आतापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. संस्थेच्या कार्यकारी परिषदेची मुदत संपायला अजून 15 महिने शिल्लक असतानाच, विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील गटाने तगडी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या राजकीय हालचालींमुळे आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दिग्गजांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव सोहळा
निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर 31 मे रोजी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांचा भव्य अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय दिग्गज एकाच मंचावर येणार आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी या आयोजनाविषयी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार
- ज्येष्ठ नेते शरद पवार या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत.
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांची प्रमुख उपस्थिती असेल.
- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
900 कोटींची उलाढाल आणि प्रतिष्ठेची निवडणूक
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी 1932 मध्ये स्थापन केलेली ही संस्था आज विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये विस्तारलेली आहे. संस्थेच्या सुमारे 350 शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या माध्यमातून साखळी पसरलेली असून, वार्षिक उलाढाल तब्बल 900 कोटी रुपये आहे. एवढी मोठी व्याप्ती आणि आर्थिक उलाढाल यामुळेच या संस्थेची सत्ता मिळवणे हे राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे मानले जाते.
( नक्की वाचा : Bank Jihad: मुंबईत बँक जिहादचा शिरकाव? बड्या बँकेतील महिला कर्मचाऱ्याला जाळ्यात ओढल्याचा नवऱ्याचा आरोप! )
निवडणुकीचे गणित आणि मतदार
सप्टेंबर 2027 मध्ये कार्यकारी परिषदेची मुदत संपणार आहे. या निवडणुकीत संस्थेचे 550 आजीव सभासद मतदानाचा हक्क बजावतील. विशेष म्हणजे, ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कायदेशीररित्या धर्मदाय आयुक्तांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. ॲड. गजानन पुंडकर हे या मतदार यादीतील सर्वात तरुण मतदार आहेत, तर अनेक मतदार वयोवृद्ध असल्याने त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागणार आहे.
अमृत महोत्सवाच्या माध्यमातून सुरू झालेली ही मोर्चेबांधणी केवळ एक सोहळा नसून, आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world