
प्रथमेश गडकरी, प्रतिनिधी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळविभागात लिचीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (16 मे) बाजारात 278 क्विंटल लिचीची आवक झाली असून सध्या दररोज दोन ते तीन गाड्यांमधून लिची बाजारात दाखल होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लिचीला प्रति किलो 200 ते 300 रुपये दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बिहार, झारखंड, पश्चिम बंगालसारख्या राज्यांमधून येणारी लिची सध्या प्रमुख प्रमाणात बाजारात दाखल होत आहे. उत्तम हवामानामुळे यंदा लिचीचे उत्पादन समाधानकारक असून त्यामुळे आगामी आठवड्यांमध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भावावर होऊन दरात घसरण होण्याचा अंदाज आहे.
नक्की वाचा - तुर्किएसोबतचा सगळा व्यवहार बंद, दागिन्यांचे नाव आता 'सिंदूर ज्वेलरी' करणार; GJCचा मोठा निर्णय
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातही लिची उत्पादनात वाढ झाली आहे. व्हिएतनाममध्ये यंदा लिचीचे उत्पादन सुमारे 30 टक्क्यांनी वाढले असून, जागतिक मागणीही तुलनात्मकदृष्ट्या अधिक आहे. एका जागतिक अभ्यासानुसार 2025 मध्ये लिची बाजाराची उलाढाल 2.36 अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून, पुढील काही वर्षांत तो 4.25 अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
सध्या बाजारात दाखल होत असलेल्या लिचीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हंगाम जसजसा पुढे सरकेल, तशी लिचीची उपलब्धता आणि दर यामध्ये स्थिरता येईल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world