जाहिरात

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत आराध्या पांडेयची चमकदार कामगिरी; जागतिक स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

आराध्याने केलेल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आराध्याची पाठ थोपटली आहे.

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत आराध्या पांडेयची चमकदार कामगिरी; जागतिक स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
मुंबई:

महाराष्ट्राच्या लेकीने आंतरराष्ट्रीय स्तरावर जबरदस्त कामगिरी करत भारताची मान उंचावली आहे. गुजरातमधील वडोदरा येथील समा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 28 ते 30 नोव्हेंबर 2025  21व्या WKI इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राची कराटेपटू आराध्या पांडेय हिने एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकत महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. 

काता आणि कुमितेमध्ये चमकदार कामगिरी

या स्पर्धेत खेळाडूंच्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी दोन प्रमुख प्रकारांमध्ये सामने झाले, काता (Kata) आणि कुमिते (Kumite). काता प्रकारात तंत्र, संतुलन आणि नियंत्रण यावर गुण दिले जातात, तर कुमिते प्रकारात प्रत्यक्ष सामना होतो. आराध्याने या दोन्ही प्रकारांमध्ये आपली पकड दाखवत भारतासाठी दोन पदके मिळवली. तिची सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी कुमिते (Kumite) प्रकारात झाली. यात आराध्याने आपल्या आत्मविश्वासाच्या आणि वेगाच्या जोरावर नेपाळच्या खेळाडूचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. तर, काता (Kata) प्रकारात तिने श्रीलंकेच्या खेळाडूवर मात करत कांस्यपदक पटकावले. आराध्याचे प्रशिक्षक पुरू रावल यांनी तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत, भविष्यात ती महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी यापेक्षाही सरस कामगिरी करेल आणि आंतरराष्ट्रीय पदके मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

मेहनत आणि शिस्तीला योग्य मार्गदर्शनाची जोड

"मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे शक्य आहे," याचा पुरावा आराध्याने दिला. तिने आपली ही कामगिरी देशाला समर्पित केली असून, भविष्यात जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्वल करण्याचे ध्येय तिने ठेवले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही थोपटली आराध्याची पाठ

आराध्याने केलेल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आराध्याची पाठ थोपटली आहे. त्यांनी X वर पोस्ट करताना म्हटले आहे की, "वडोदरा येथे झालेल्या WKI इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत महाराष्ट्राची आराध्या पांडेय हिने कुमितेमध्ये सुवर्ण आणि कातामध्ये कांस्य पदक जिंकत भारताचा झेंडा अभिमानाने उंचावला. मी तिचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राची लेक म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे. तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !"

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com