Ashadhi Ekadashi 2026: यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी अधिक सुखकर आणि सुविधायुक्त व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक सुसज्ज करण्यावर भर देऊन, पंढरपूर विकास आराखड्याच्या कामाला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत पालखी मार्ग आणि विश्रामस्थळांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरण केले. 1303 कोटी रुपयांच्या प्रस्तावित आराखड्यापैकी आतापर्यंत 959 कोटी रुपये खर्च झाले असून, स्वच्छतागृहे, पालखी कट्टे, हायमास्ट पोल आणि रस्ते दुरुस्तीसह बहुतांश कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी: CM फडणवीस
आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली, सुविधायुक्त करण्यात यावी, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नये याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे 1303 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी 964 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील 959 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या आराखड्यांतर्गत दोन्ही पालखी मार्गातील पालखीतळांच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानीचे बांधकाम करणे, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पोल उभारणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे आदी कामांपैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Photo Credit: NDTV Marathi
पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान 8 जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान 7 जुलै रोजी होणार आहे. दोन्ही पालखी मार्गावर वारकरी भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नये याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना आणखी कोणत्या सुविधा हव्यात त्या करून द्याव्या. पालखी तळावर कायमस्वरुपी पायाभूत सुविधांची कामे करावी. पालखी तळावर वारकऱ्यांसाठी गेल्या वर्षी हँगरची व्यवस्था करण्यात आली होती, त्या प्रमाणे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी.
पुलकुंडवार म्हणाले की, पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. गेल्या वर्षी दोन्ही पालखी मार्गावर 3700 मोबाइल शौचालये पुरविण्यात आली होती. यंदा 5 हजार मोबाइल शौचालये पुरविण्याचे नियोजन आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गाची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गांची कामे सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world