
स्वानंद पाटील, बीड
बीड शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे आज मनसेने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर सरण आंदोलन केले. बीड शहरातील नगर रोड, मोंढा रोड, पालवन रोड या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने हे आंदोलन करण्यात आलं आहे.
मोंढा रोड परिसरातील अमरधाम स्मशानभूमीसमोरील पुलाची दुरावस्था झाली आहे. पुलावरील लोखंडी सळ्यांचा सांगडा उघड पडला आहे. याचाच अंदाज न आल्याने दररोज अपघात देखील होत आहेत. हा रस्ता दुरुस्त केला जावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडून केली जात आहे.
मात्र प्रशासनाचं याकडे आहे दुर्लक्ष होत असून परिस्थिती जैसे थेच आहे. आज अमरधाम स्मशानभूमी समोरच सरण रचून मनसेने हे लक्षवेधी आंदोलन केले. सदरील प्रश्न मार्गी लागला नाही तर मात्र मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.