Sharad Pawar ON CM Devendra Fadnavis: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलीनकरणाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले होते. विलिनीकरणाच्या चर्चांबाबत अजित पवार काही बोलले नाहीत, चर्चा सुरु असत्या तर बोलले असते, असं ते म्हणाले. यावरुनच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिसवाल केला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
"अजित पवार यांचे स्मारक होण्याबाबत पेपरमध्ये वाचले. ही गोष्ट मला माहित नाही. ज्या संस्थेची चर्चा काही लोकांनी केली त्याचा अध्यक्ष मी आहे, निदान मला तरी ठाऊक असावे. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही सर्वजण बसून त्याबाबत विचार करु मात्र कोणतीही चर्चा झाली नसताना बोलणे चुकीचे आहे. असे शरद पवार म्हणाले. तसेच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, त्याबाबत आनंद आहे, संधी दिली त्याबाबत आनंद आहे," असेही शरद पवार म्हणाले.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नालाही उत्तर दिले. "त्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे समजले नाही. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. मगं त्यांना भाष्य करण्याचा अधिकार नाही. आमचे सहकारी, जयंत पाटील आणि अजित पवार याबाबत भाष्य करत होते. आम्हा लोकांच्या समोर संकट आहे. परस्परांना धीर देण्याचे काम आम्ही करत आहोत. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कुणाशी चर्चा करत नाही, असा पलटवार शरद पवार यांनी केला.
भारत- अमेरिका करारावर चिंता
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प तसेच अमेरिकेसोबत झालेल्या कराराबाबतही शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले.अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जो करार होत आहे, त्याचे स्वच्छ चित्र दोन दिवसात समोर येईल त्यावेळी त्याच्यावर सविस्तर भाष्य करण्यात येईल. मात्र आत्ता जो लोकांच्या समोर अमेरिकेने जाहीर केल्यानुसार कृषीक्षेत्रात त्यांना निर्यात करता येईल अशी तरतूद आहे. ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळजी करण्याची गोष्ट आहे. अमेरिका हा शक्तीशाली देश आहे. आर्थिक ताकद त्यांची जास्त आहे. त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम त्या देशाच्या उत्पादनावर विपरित परिणाम होतो. तशी स्थिती येऊ नये अशी चिंता आहे, अस शरद पवार म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world