आकाश सावंत, बीड
बीड जिल्ह्यातील बहुचर्चित मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली असून, सध्या कारागृहातच त्याच्यावर सलाईन लावून प्राथमिक उपचार सुरू आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
वाल्मिक कराडवर अंबाजोगाई येथे उपचार होणार
वैद्यकीय तपासणीत ‘युरोसिसटायटीस' प्रकारच्या संसर्गाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने कारागृहात जाऊन त्याची तपासणी केली. मात्र, बीड जिल्हा रुग्णालयात संबंधित आजारावरील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने आता वाल्मिक कराडला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
(नक्की वाचा- ओबीसींसाठी मोठी बातमी! नॉन-क्रिमी लेयरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार? उपसमितीच्या बैठकीत काय घडलं?)
संसर्ग वाढल्यास यकृतावर परिणाम होण्याची शक्यता
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास संसर्ग वाढून यकृतावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही वाल्मिक कराड याची प्रकृती अचानक ढासळली होती. त्यावेळी त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
(नक्की वाचा- Ulhasnagar Crime: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकायचे अन्..., विठ्ठलवाडी पोलिसांकडून दोघांना अटक)
विविध वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुन्हा कारागृहात पाठवले होते. तसेच कारागृहातच आवश्यक उपचार सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यावेळी डॉक्टरांकडून देण्यात आली होती.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आधीच राज्यभरात मोठी खळबळ उडालेली असताना, आता मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या प्रकृतीबाबत समोर आलेल्या या घडामोडींमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.