जाहिरात

श्रीकांत शिंदेंना भेटायचं होतं, त्याआधीच वृद्धाचा कार्यक्रमस्थळी मृत्यू; भेटीसाठीचं कारणही मन सुन्न करणारं

Beed News: खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या 68 वर्षीय वृद्धाचा कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गर्दी आणि उष्णतेमुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

श्रीकांत शिंदेंना भेटायचं होतं, त्याआधीच वृद्धाचा कार्यक्रमस्थळी मृत्यू; भेटीसाठीचं कारणही मन सुन्न करणारं

आकाश सावंत, बीड

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बीड जिल्हा दौऱ्यादरम्यान केज येथे एक अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे. खासदार शिंदे यांची भेट घेऊन आपल्या कुटुंबासाठी मदतीचे निवेदन देण्यासाठी आलेल्या 68 वर्षीय रसूल गफूर सय्यद या वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेली प्रचंड गर्दी आणि कडक उष्णतेमुळे श्वास कोंडल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

मुलाच्या मृत्यूनंतर मदतीची होती अपेक्षा 

मृत रसूल सय्यद यांच्या कुटुंबावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला होता. 10 मे रोजी रसूल यांच्या मुलाचा स्वतःच्या मुलीला पाण्यात बुडण्यापासून वाचवताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. कर्ता मुलगा गमावल्यामुळे हताश झालेले रसूल सय्यद हे कुटुंबातील इतर सदस्यांसह काही आर्थिक मदत मिळेल, या आशेने खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी केज येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते.

(नक्की वाचा-  Japan Bans Indian Mangoes: हापूससह भारतीय आंब्यांना जपानमध्ये बंदी! तपासणीत धक्कादायक बाबी आल्या समोर)

गर्दी आणि उष्णतेमुळे गुदमरला श्वास

मृत वृद्धाचा मुलगा पाशा सय्यद यांनी याबाबत सांगितलं की, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यातच उष्णता यामुळे तेथे उपस्थित रसूल सय्यद यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. गर्दीत श्वास गुदमरल्यासारखे झाल्यामुळे रसूल सय्यद तेथेच कोसळले. कुटुंबाने त्यांना तातडीने जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

(नक्की वाचा-  Hardik Pandya: हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघ सोडणार? रोहितकडे मोठी जबाबदारी? MI मध्ये चाललंय काय?)

रसूल यांना इमर्जन्सी वॉर्डात आणण्यात आले होते. रुग्णालयात आणताच त्यांना सीपीआर (CPR) देऊन वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशा डॉक्टरांनी सांगितलं. मदतीची आस घेऊन आलेल्या एका हतबल वृद्धाचा अशा रीतीने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com