BMC Election 2026 MNS Shivsena Alliance: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधु एकत्र आल्याने रंगत वाढली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना १५४, मनसे ६३ जागा लढवत आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची सर्व जागांवर युती झालेली असतानाच वार्ड क्रमांक 67 मध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी मनसे आणि शिवसेना उबाठा या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अधिकृत अर्ज भरल्याची माहिती पुढे आली आहे.
ठाकरेंकडून बंडखोरी?
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत वार्ड क्रमांक ६७ मध्ये एक अत्यंत रंजक आणि पेचात टाकणारी स्थिती निर्माण झाली आहे. या वार्डातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे. महापालिकेकडून अर्जांच्या छाननीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावे कायम असल्याने, या ठिकाणी 'मैत्रीपूर्ण' लढत होणार की राजकीय संघर्ष, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका वॉर्डात दोन्ही पक्षाचे उमेदवार..
दोन्ही पक्षांनी अर्ज दाखल केल्यानंतर मनसे उमेदवार कुशल धुरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरेंनी या युतीची अधिकृत उमेदवारी आपल्याला दिली आहे. त्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत न राहता शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने बंडखोरी केली असा आरोप कुशल धुरी करत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना (उबाठा) गटाने आपला उमेदवार रिंगणात उतरवणे हे युतीच्या धर्माला धरून नाही.
दरम्यान, या जागेवरुन मनसे- शिवसेनेत खलबते सुरू आहेत. जर दोन्ही उमेदवार मैदानात राहिले, तर मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा तिसऱ्या पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासकीय पातळीवर अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, आता माघारीच्या मुदतीपर्यंत कोणाची समजूत काढली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world