राहुल कुलकर्णी, पुणे: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत महायुतीने पुन्हा एकदा राज्यात सत्ता खेचून आणली आहे. विधानसभेच्या या दणदणीत विजयानंतर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटाच्या आमदारांकडून जोरदार जल्लोष केला जात आहे. दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पैकी मुख्यमंत्री कोणाचा होणार? याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. अशातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महत्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा आमच्या गोर गरिबांचे संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केले. याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं त्यांनी झोकून काम केले, असं छगन भुजबळ म्हणाले.
नक्की वाचा: Exclusive : राज्यात सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला, कसं असेल संभाव्य मंत्रिमंडळ?
तसेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क आहे त्यांना शुभेच्छा. दादा मुख्यमंत्री झाले तरी चांगलं आहे. पण यावेळी 132 आमदार त्यांचे आहेत म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होईल फडणवीस झाले तरी आनंदच होईल. असे सर्वात महत्वाचे विधानही त्यांनी केले. भुजबळ यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव पुढे केले जात आहे का? असा सवाल आता उपस्थित आहे.
ईव्हीएम मशीनने जिंकलो असेल तर मला देखील एक लाख मत मिळायला हवी होती. माझे मताधिक्य वाढायला हवं होतं ते कमी झाले. मनोज जरांगे पाटील साहेब आदल्या दिवशी सकाळी दहापासून रात्री दोनपर्यंत गावोगावी फिरले आणि जातिवाद पसरवण्याच काम केलं म्हणून माझं मताधिक्य कमी झाले, असा दावाही भुजबळ यांनी केला.