Chhatrapati Sambhajinagar Viral Video DCP Viral Video: 'परिस्थितीचं भांडवलं करण्यापेक्षा संघर्षाची तयारी ठेवा' असं म्हणतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु असलेल्या पोलीस भरतीच्या मैदानावर असाच प्रसंग पाहायला मिळाला. मैदानावर सर्व तरुण डोळ्यात वर्दीचं स्वप्न घेऊ धावत होते, या तरुणांच्या गर्दीत एका मुलाकडे सर्वांची नजर गेली. गर्दीमध्ये हा तरुण पायात चप्पल घालून धावत होता. मैदानावर सर्व मुलं महागडे शूज घालून धावत असताना या तरुणाच्या पायातील चप्पल पाहून अनेकांना प्रश्न पडला. मात्र त्यामागची कथा ऐकून डीसीपीही भारावुन गेले. नेमकं काय घडलं? वाचा...
तरुणाची जिद्द, डीसीपीही भारावले
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरती सुरु आहे. पोलीस भरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी DCP विक्रम साळवी मैदानावर आले होते. मैदानावर धावणाऱ्या तरुणांशी ते चर्चा करत होते, आवश्यक तिथे सल्ला देत होते. अशातच त्यांची नजर एका अशा उमेदवारावर पडली जो चप्पल घालून धावत होता. डीसीपींनी त्याला तात्काळ जवळ बोलावले, तू चप्पलवर का धावलासं असं विचारलं? त्यावेळी त्या तरुणाने जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वजण भावुक झाले.
त्याने सांगितले की, साहेब शूज घ्यायला पैसे नव्हते, घरची परिस्थिती नाही. पण वर्दीचं स्वप्न आहे, ते मी पूर्ण करणार आहे. तरुणाचं हे उत्तर अन् त्याच्या मनातली जिद्द पाहून डीसीपी विक्रम साळवी भारावुन गेले. परिस्थितीमुळे रडत न बसता अडचणींना पायदळी तुडवत ध्येयाकडे झेपावण्याची त्याची इच्छाशक्ती पाहून विक्रम साळवींनी त्याचं कौतुक केले. इतकेच नव्हेतर त्यांनी क्षणभरही उशीर न करता खिशातून पैसे काढले अन् तरुणाकडे देत त्याला शूज आणाला पाठवले. काही वेळातच पांढरे शुभ्र शूज आले.
नेटकऱ्यांकडून कौतुक
तेव्हा स्वत: पोलीस साहेबांनी आपल्या हाताने शूज त्याला दिले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी कोणीतरी व्हिडिओ काढत होते पण साहेबांनी व्हिडिओ काढू नका, ही छोटीशी मदत आहे असं सांगितलं.. एका तरुणाची जिद्द अन् त्याच्या या जिद्दीला एका अधिकाऱ्याने दिलेली संवेदनशील प्रतिक्रिया.. अशा या प्रसंगाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणाच्या जिद्दीचं कौतुक केले आहे तर काही नेटकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनाही मनापासून सलाम ठोकला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world