जाहिरात

इंधन दरवाढीचा परिणाम थेट जनावरांच्या बाजारावर; बैलजोड्यांचे दर ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या बैल बाजारात सध्या शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

इंधन दरवाढीचा परिणाम थेट जनावरांच्या बाजारावर; बैलजोड्यांचे दर ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या बैल बाजारात सध्या शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पेरणीचे वेध लागताच शेतकरी मशागतीसाठी बैल खरेदीला प्राधान्य देत आहेत. मात्र, यंदा या बाजारात केवळ बैलच नाही, तर त्यांच्या किमतीही उफाळून आल्या आहेत. गावरान आणि खिल्लारी बैलांच्या जोड्या पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटत असले, तरी किमती ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकत आहे. ​

एकीकडे ट्रॅक्टरने मशागत करणे डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आवाक्याबाहेर गेले आहे. डिझेलच्या किमतींनी शंभरी पार केल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा पारंपरिक शेतीकडे म्हणजेच बैलजोडीकडे वळू लागला आहे. पण इथेही महागाईचा विळखा सुटलेला नाही. इंधन दरवाढीचा परिणाम थेट जनावरांच्या बाजारावर झाला असून मशागतीसाठी बैलांना असलेली मागणी प्रचंड वाढली आहे. परिणामी, कालपर्यंत परवडणाऱ्या बैलजोड्या आज 'लक्झरी' वस्तूंसारख्या महागल्या आहेत.

दीड लाखांची जोडी; अल्पभूधारकांची 'कोंडी'

​बाजारात सध्या बैलजोड्यांचे दर ७० हजारांपासून सुरू होऊन चक्क दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दीड लाख रुपये खर्च करून बैल खरेदी करणे हे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेरचे स्वप्न ठरत आहे. "शेती करावी की बैल घ्यावेत?" अशा कात्रीत सामान्य शेतकरी अडकला आहे. मोठ्या शेतकऱ्यांकडे भांडवल असले तरी छोट्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. बैलांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे ढग दाटले आहेत.

नक्की वाचा - Beed News : बाळ 22 तासांपूर्वी गर्भातच गेलं, आई तशीच फिरत राहिली; बीडमधील हादरवणारी घटना!

​शेतकऱ्याची आर्त हाक: "पैसे आणायचे कुठून?"

​मशागत तर करावीच लागणार, पण त्यासाठी लागणारी ही 'महागडी' साथ कशी मिळवायची, हा प्रश्न अनुत्तरित आहे. बाजारात आलेल्या शेतकऱ्यांच्या बोलण्यातून केवळ हतबलता व्यक्त होत आहे. "बैलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, शेतीसाठी बैल घ्यायचे तरी पैसे आणायचे कुठून?" असा सवाल माऊली वाघ या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. सरकार आणि निसर्गाच्या दुहेरी फेऱ्यात अडकलेला बळीराजा आता बैल बाजारातील या 'तेजी'मुळे अक्षरशः हवालदिल झाला आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com