जाहिरात

Beed News : बाळ 22 तासांपूर्वी गर्भातच गेलं, आई तशीच फिरत राहिली; बीडमधील हादरवणारी घटना!

एका आईच्या कुशीत येण्याआधीच तिचं बाळ कायमचं निघून गेलं. आईवर मात्र मृत बाळ २२ तास पोटात ठेवल्याची घटना घडली आहे.

Beed News : बाळ 22 तासांपूर्वी गर्भातच गेलं, आई तशीच फिरत राहिली; बीडमधील हादरवणारी घटना!
प्रतिकात्मक फोटो

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed News : एका आईच्या कुशीत येण्याआधीच तिचं बाळ कायमचं निघून गेलं आणि त्यानंतरही पैशांच्या हव्यासापोटी त्या मृत भ्रृणाला तब्बल 22 तास आईच्या पोटातच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या परळीतून समोर आला आहे. या प्रकारामुळे केवळ बाळाचाच नाही, तर त्या मातेच्याही जीवाशी खेळ खेळल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. गिते रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात या महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. आठ महिन्यांपासून ज्या डॉक्टरांवर विश्वास ठेवला, त्याच डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या बाळाचा जीव गेला, असा आरोप करत पीडित महिलेच्या पतीने हंबरडा फोडला.

काय आहे प्रकरण? 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित गर्भवती महिलेला पोटात दुखू लागल्याने तिला गीते रुग्णालयात नेण्यात आलं होतं. येथे सोनोग्राफी न करता तिला घरी पाठविण्यात आलं. त्यानंतर जेव्हा दुसरीकडे तपासणी केली त्यावेळी गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तरीही नॉर्मल डिलिव्हरी करून देते असं सांगत मृत बाळ तब्बल 22 तास आईच्या पोटातच ठेवल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकारामुळे महिलेच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी महिलेच्या पतीने केली.

नक्की वाचा - फास्ट ट्रॅक कोर्ट तरीही 3 वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा; नसरापूरच्या घटनेदरम्यान जळगावातील प्रकरण चर्चेत

खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह...

परळीतील एका खासगी रुग्णालयाविरोधात धक्कादायक तक्रार समोर आली. जास्तीचे पैसे उकळण्यासाठी डॉक्टरांनी मृत बाळ तब्बल 22 तास आईच्या पोटातच ठेवल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. आरोग्य विभागाने तातडीने दखल घेत चौकशी समिती गठीत केली आहे. तक्रार अत्यंत गंभीर स्वरूपाची असून 24 तासांच्या आत तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली. संबंधित रुग्णालयातील कागदपत्रांची तपासणी डॉक्टरांचे जबाब आणि वैद्यकीय प्रक्रियेची चौकशी करून लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे.

एका आईच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण दु:खाच्या खोल गर्तेत ढकलणारी ही घटना आता संपूर्ण परळीत चर्चेचा विषय ठरलीय. मृत भ्रृण तब्बल २२ तास पोटात ठेवल्याच्या आरोपांमुळे खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे. दरम्यान, आरोग्य विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती नियुक्त केली असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. आता या चौकशीतून नेमकं सत्य काय समोर येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com