देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. सायंकाळी पाच वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याशिवाय अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं त्यांनीच काल ४ डिसेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हा तिढा अद्याप सुटलेला नाही. शपथविधी सोहळ्याला अवघे चार तास शिल्लक असताना समोर आलेल्या निमंत्रण पत्रिकेत कुठेच एकनाथ शिंदेंच्या नावाचा उल्लेख नाही. याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे लवकरच आपला निर्णय जाहीर करतील असं सांगितलंय.
नक्की वाचा - शपथविधी सोहळ्यापूर्वी मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन
तीन निमंत्रण पत्रिका मात्र शिंदेंचं नाव नाही...
भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका समोर आल्या आहेत. मात्र एकाही पत्रिकेत एकनाथ शिंदेंच्या नावाचा उल्लेख नाही. भाजपच्या निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे. त्याशिवाय शिवसेनेच्या पत्रिकेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख आहे, तर अजित पवारांच्या पत्रिकेत मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र या पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव नाही.
महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री कोण असतील याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ड्रामा निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेंकडून 'प्रेशर पॉलिटिक्स' सुरू असल्याचीही चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world