राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला आंदोलन करणे जमत नाही असा नेहमी आरोप केला जातो. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस आक्रमक होताना दिसत असून या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आक्रमक आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आणि खासकरून पश्चिम महाराष्ट्रातील वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या टोलच्या मुद्दावरून काँग्रेसने आंदोलन करायचे ठरवले आहे. पुणे ते बंगळुरू महामार्गावर असणाऱ्या टोलनाक्यांवर काँग्रेस 3 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहे. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उतरणार असल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे.
हे ही वाचा: राजकारणात एक तर मी राहीन, नाहीतर फडणवीस राहतील
पुणे ते बंगळुरू दरम्यान 4 टोलनाके येतात. या प्रत्येक टोलनाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. टोल वसूल केला जातो मात्र टोलच्या बदल्यात वाहनचालकांना आवश्यक त्या सोई-सुविधा दिल्या जात नाही. महामार्गावर खड्डे पडले असून त्याकडे लक्ष दिले जात नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे. 3 ऑगस्टला काँग्रेस या चारही टोलनाक्यांवर टोल न घेता वाहने सोडण्यास भाग पाडणार आहे आहे. या आंदोलनात काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार विश्वजीत कदम , काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.
हे ही वाचा: गणपतीत कोकणात जाताय? बिनधास्त जा! एसटीने घेतला मोठा निर्णय
कोणत्या नेत्याकडे कोणत्या टोलची जबाबदारी?
कोल्हापूरच्या किणी टोल नाका येथे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते थांबून आंदोलन करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराडमधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील. सातारा जवळच्या आणेवाडी टोल नाक्यावरती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, खंडाळा या तालुक्यातील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते सहभागी होतील. पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यावर काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील.