राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. बुधवारी (28 मे) राज्यात कोरोनाचे 86 नवे रुग्ण सापडले. त्यानुसार, सध्या कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 383 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यातील कोरोनाची आकडेवारी
जानेवारी 2025 पासून केलेल्या कोविड चाचणी संख्या - 8868
जानेवारी 2025 पासून पॉझिटिव्ह रुग्ण - 521
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 132
बुधवारी सापडलेले रुग्ण - 86 (मुंबई-36, पुणे मनपा-9, पिंपरी चिंचवड मनपा-3, ठाणे मनपा-24, कल्याण मनपा -2, नवी मुंबई मनपा 4, पनवेल मनपा 4. नागपूर मनपा , अहिल्यानगर मनपा -2, रायगड -1).
सक्रिय रुग्णसंख्या - 383
जानेवारी 2025 पासून मुंबई मधील एकूण रुग्ण संख्या - 352
नक्की वाचा - Rain Alert : राज्यातील 6 जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?
दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व निदान झालेले रुग्णांची लक्षणं सौम्य स्वरूपाची आहे. जानेवारी 2025 पासून आजपर्यंत सहव्याधीने ग्रस्त असलेले 5 व इतर असे एकूण 6 रुग्ण दगावले. यापैकी एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम सह हायपोकॅल्सिमिक सॉझ्झर होते तर दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तसेच तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि फिट येत होती. चौथ्या रुग्णास डायबेटिक किटोअॅसीडोसीस आजार होता. पाचव्या रुग्णास ILD होता. सहावा रुग्ण 47 वर्षीय महिला असून, सदर महिलेस ताप आणि धाप लागणे ही लक्षणे होती.
कोविड संभाव्य धोका लक्षात घेता नवी मुंबई महापालिका सज्ज
राज्यात पुन्हा काही ठिकाणी कोविड-१९ रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेण्यात आला. या अंतर्गत नेरुळमधील मातोश्री रुग्णालयासह महापालिकेच्या तिन्ही रुग्णालयांमध्ये राखीव बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आरटीपीसीआर चाचण्या, औषधांचा साठा, पीपीई किट्स, ऑक्सिजन व आवश्यक सर्जिकल साहित्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या नवी मुंबईत एकूण १९ कोविड रुग्ण आढळले असून आतापर्यंत 60 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.