मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, महायुतीने घवघवीत यश मिळवत दुसऱ्यांदा सत्ता खेचून आणली. मात्र भारतीय जनता पक्षाकडून अद्यापही मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत मात्र कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम आहे. अशातच भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी पीटीआयला याबाबतची माहिती दिली. तसेच भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक २ किंवा ३ डिसेंबर रोजी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
राज्यातील नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यात सहभागी होणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे दोनदा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या स्थापनेमुळे दुसरी टर्म काही दिवसांची ठरली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते.
नक्की वाचा: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार! हजारो आंदोलक दिल्लीत धडकणार; संसदेला घेराव घालणार
भाजपकडून आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या असून ४ डिसेंबरला भाजपा विधीमंडळ गट नेते निवड होण्याची शक्यता आहे. त्या दिवशी सर्व भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. भाजपा विधीमंडळ गट नेते निवडीनंतर महायुतीची एकत्र बैठक होणार आहे. बैठकीत भाजपाची मुख्यमंत्री पदाच्या नेत्यांची निवडीचा ठराव पार पडणार असून त्यानंतर राज्यपाल महोदयांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आज माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. प्रकृती ठीक नसल्याने दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावरुन आलेले मुख्यमंत्री सध्या ठाण्यामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही त्यांची भेट घेणार असून या भेटीत जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
महत्वाची बातमी: सरकार स्थापनेला उशीर, अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फटका