नागिंद मोरे, धुळे
Dhule News: उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी घराघरांत कुलरचा वापर वाढला आहे. मात्र, शिरपूर तालुक्यात याच कुलरने दोन जणांचा बळी घेतल्याची घटना समोर आल्या आहेत. अवघ्या 48 तासांच्या अंतराने भामपूर आणि होळनाथे गावात कुलरमध्ये वीजप्रवाह उतरून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पहिली घटना, भामपूर
भामपूर येथील रहिवासी महेश मिला भरवाड हा तरुण नेहमीप्रमाणे घरातील कुलरजवळ गेला होता. कुलरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे करंट उतरलेला होता, ज्याचा महेशला अंदाज आला नाही. कुलरला स्पर्श होताच त्याला विजेचा इतका तीव्र धक्का बसला की त्याचा जागीच मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
दुसरी घटना, होळनाथे
दुसरी हृदयद्रावक घटना होळनाथे गावात घडली. हर्षल विनोद मराठे (वय 16) हा शाळकरी मुलगा घरात अभ्यास करत होता. अभ्यासाच्या गडबडीत त्याचा स्पर्श सुरू असलेल्या कुलरला झाला. या कुलरमध्येही वीजप्रवाह उतरलेला असल्याने हर्षलला जोरदार धक्का बसला. उचचारासाठी त्याला जवळी ल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने मराठे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अशा दुर्घटना का घडतात?
तज्ज्ञांच्या मते, कुलरचा वापर करताना काही लहान चुका जिवावर बेतू शकतात. जुन्या झालेल्या वायरमधून वीजप्रवाह कुलरच्या लोखंडी बॉडीमध्ये उतरतो. घरात योग्य अर्थिंग नसल्यास करंट थेट मानवी शरीरातून जमिनीत जाण्याचा प्रयत्न करतो, जो जीवघेणा ठरतो. कुलर सुरू असताना पाणी भरल्याने शॉक लागण्याची शक्यता वाढते. ओल्या हाताने बटन चालू करणे किंवा कुलरला स्पर्श करणे अत्यंत धोकादायक आहे.
(नक्की वाचा- Cold Water Bath: थंड पाण्याने अंघोळीचे आश्चर्यकारक फायदे; मात्र या व्यक्तींसाठी ठरू शकते घातक)
कुलर वापरताना ही खबरदारी नक्की घ्या
- लोखंडी बॉडीऐवजी फायबर बॉडीचा कुलर वापरा.
- दरवर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कुलरच्या वायर आणि मोटारची इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करून घ्या.
- घरात RCCB बसवून घ्या, ज्यामुळे करंट लागताच वीजपुरवठा खंडित होतो.
- कुलरमध्ये पाणी भरताना प्लग पूर्णपणे बाहेर काढा.
- कुलरसाठी थ्री-पिन प्लग आणि सॉकेटचाच वापर करा जेणेकरून अर्थिंग सुरक्षित राहील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world