
Maharashtra Rain Update : ऐन दिवाळीच पावसाच्या आगमनाने नागरिकांची तारांबळ उडाली. 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अवघ्या एका तासात 101.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बदलापुरात अनेक ठिकाणी काही तासांच्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं होतं. तर अनेक भागात वीजपुरवठाही खंडीत झाला. अचानक आलेल्या पावसामुळे फटाके फोडण्याच्या तयारीत असलेल्या मुलांचा हिरमोड झाला. अनेक ठिकाणावरील दिवाळीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले.
दरम्यान पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्याचा परिणाम म्हणून राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी रायगड, रत्नागिरीस ठाणे याशिवाय छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या दिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत पावसाची शक्यता आहे.
नक्की वाचा - बीडमध्ये दिवाळीत पावसाचे संकट तीन दिवसांचा यलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा
बीडमध्ये दिवाळीत पावसाचे संकट तीन दिवसांचा यलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा
राज्यात ऐन दिवाळीच्या लगबगीत आता पुन्हा पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सलग तीन दिवस म्हणजेच 23, 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, प्रतितास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या दीड पट पाऊस झाला होता. 566 मिमीच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल 925 मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असलं तरी प्रकल्प पूर्ण भरले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
रत्नागिरीत पावसाची हजेरी
परतीच्या पावसाने काल रात्रीही रत्नागिरी जिल्ह्यात हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जवळपास अर्धा तास पाऊस पडला. सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावेळी पावसाने अचानक सुरुवात केल्याने नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडलं. सोमवारीही पावसाने काही भागांत हजेरी लावली होती. मंगळवारी रात्रीही मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटात वादळी वारे वाहू लागले. थोड्या वेळातच पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी शहरात या पावसाने तारांबळ उडवून दिली. बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ झाली. शहरातील शिवाजीनगर येथील आठवडा बाजारात आलेल्या नागरिकांचीही पळापळ सुरू झाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world