'निवडणुका होईपर्यंत कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांना भेटू नका. त्यांना फोनवरूनच शुभेच्छा द्या, आपली मैत्री, आपले संबंध 20 तारखेनंतर.. तोपर्यंत फक्त राजकारण, निवडणुका आणि महायुती', असं म्हणत भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी महायुतीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. शिंदे गटाचे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्षांनी या कानपिचक्या दिल्या.
निवडणुकीच्या काळात आपला वाढदिवस असेल तर एखादा प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्ता आपल्याला भेटायला येतो, त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून संभ्रम निर्माण करतो. त्यामुळे 20 तारखेपर्यंत आपली मैत्री, आपले संबंध बाजूला ठेवा, आणि कुणालाही भेटू नका, फोनवरून शुभेच्छा स्वीकारा, त्यांना सांगा तुमच्या निवडणुका तुम्ही लढा आमच्या निवडणुका आम्ही लढतो.
नक्की वाचा - मनोज जरांगे आज भूमिका जाहीर करणार, कुठे आणि किती उमेदवार देणार? बैठकीआधी दिले संकेत
बाकी सगळं 20 तारखेनंतर असं भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी म्हणाले. 20 तारखेपर्यंत फक्त राजकारण, निवडणूक, महायुती आणि धनुष्यबाण इतकंच लक्षात ठेवा, असं सूर्यवंशी म्हणाले. यावर सुनील चौधरींना विचारलं असता, वानखेडे हे माझे जुने मित्र असून ते भाजपात असताना आम्ही युती म्हणून एकत्र काम केलं होतं. त्यामुळे ते माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले, पण यात राजकीय काहीही नाही, असं चौधरी यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world