मुंबईत मोठ्या घडामोडी! एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता महायुतीमध्ये नवा मुख्यमंत्री निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षांमधील नेत्यांकडून आपलाच मुख्यमंत्री व्हावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे. अ

जाहिरात
Read Time: 2 mins

अक्षय कुडकेलवार, मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता महायुतीमध्ये नवा मुख्यमंत्री निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षांमधील नेत्यांकडून आपलाच मुख्यमंत्री व्हावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे. अशातच राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजीनामा देणार असल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्याच्या जुन्या विधानसभेचा कार्यकाळ उद्या म्हणजेच 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे जुनी विधानसभा उद्या बरखास्त होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे. उद्या जुनी विधानसभा बरखास्त होत असून तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

नक्की वाचा: ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पुन्हा फुटणार? सत्तास्थापनेनंतर महायुती 'करेक्ट कार्यक्रम' करणार

दुसरीकडे महायुतीमध्ये आता मुख्यमंत्री निवडीच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाल्या आहेत. आज रात्री उशिरा ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होणार आहे. तसेच आजच्या बैठकीतच एक नाव ठरवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ उद्या म्हणजेच 26 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही दिल्लीला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीमध्ये तिन्ही नेत्यांची भाजप हायकमांडशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत मुख्यमंत्रीपद तसेच मंत्रीपदाच्या वाटपाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Advertisement

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री दिले जाणार असल्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र सरकार पाहायला मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

महत्वाची बातमी: काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा? स्वतः नाना पटोलेंनी खुलासा केला; म्हणाले..