
Maratha Reservation lalbaugcha Raja News: आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात लाखो आंदोलक मुंबईत आल्याने वाहतूक कोंडीसह इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे सरकारने जाणून बुजून खाऊ गल्ल्या बंद ठेवल्या असल्याने आंदोलकांचे हाल होत असल्याचाही आरोप होत आहे. असाच आरोप लालबागचा राजा मंडळावरही होत आहे, ज्यामुळे मराठा बांधवांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र या व्हायरल मेसेजमागचे सत्य मात्र वेगळेच आहे.
काय आहे व्हायरल मेसेज?
"मुंबईत लालबागचा राजा नावाच्या गणपतीचे मंडळ आहे. यांचे अन्नछत्र यांनी मराठा आंदोलक येऊन जेवतील म्हणून बंद ठेवले. करोडो रुपयाची यांना वर्गणी दान मिळते पण यांच्यात मराठ्यांबद्दलचा कसा द्वेष आहे ते पहा. लालबागचा राजा कसा आहे? हे महाराष्ट्र आणि मराठ्यांना दाखवून दिले," असा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र या व्हायरल मेसेजमागचे सत्य मात्र वेगळेच असल्याचे समोर आले आहे.
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला BMCची नोटीस! अन्नछत्रासाठी परवानगी नाकारली
नेमके सत्य काय?
वास्तविक लालबागचा राजा मंडळाने यावर्षीपासून गणेशोत्सव काळात दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद स्वरुपात जेवण देण्याचे ठरवले होते. परंतु मुंबई महापालिकेने या अन्नछत्रासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदा हा महाप्रसादाचा उपक्रम होऊ शकणार नाही. लालबागचा राजा मंडळाने अन्नछत्रासाठी पेरू कंपाऊंड उभारलेल्या मंडपालाही मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे.
लालबागचा राजा मंडळाने गणेशोत्सव काळात भाविकांची गर्दी पाहता त्यांच्यासाठी महाप्रसाद देण्याची घोषणा केली होती. परंतु पहिल्याच दिवशी भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलीस तसेच अग्निशमन दलाने या अन्नछत्राला परवानगी देण्यास नकार दिला होता. मराठा आंदोलक मुंबईत येण्यापूर्वीच हा उपक्रम बंद करण्यात आला, त्यामुळे व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असल्याचं समोर आले आहे.
मराठा आंदोलकांना आधार; मुंबई महापालिकेने आझाद मैदानात दिल्या तात्काळ सेवा-सुविधा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world