ऋतिक गणकवार, मुंबई:
FDA Raid Beauty Cream: गोरे होण्यासाठी तुम्हीही वेगवेगळ्या क्रीम वापरत असाल तर तुमच्यसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सौंदर्य खुलवण्यासाठी आपण अनेकदा बाजारात मिळणाऱ्या विविध ब्युटी क्रीम्सवर विश्वास ठेवतो. मात्र, तुमची ही आवड आता आरोग्यासाठी घातक ठरू शकते. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नुकत्याच केलेल्या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या 'गोरी ब्युटी क्रीम' (Goree Beauty Cream), 'फेस फ्रेश गोल्ड' (Face Fresh Gold) आणि 'गोल्डन स्टार ब्युटी क्रीम' (Golden Star Beauty Cream) या उत्पादनांमध्ये पारा (Mercury) आणि शिसे (Lead) यांसारख्या विषारी धातूंचे प्रमाण मानकांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.
एफडीएची मोठी कारवाई, तीन ब्युटी प्रोडक्ट्सवर बंदी
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, या उत्पादनांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, त्यात आरोग्यास हानिकारक ठरणारी द्रव्ये सापडली आहेत. विशेष म्हणजे, या उत्पादनांच्या लेबलवर उत्पादकाचे नाव, पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट यांसारखी महत्त्वाची माहितीही गहाळ आहे. यामुळे ही उत्पादने निकृष्ट दर्जाची असल्याचे घोषित करून त्यांच्या विक्रीवर आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.

केवळ किरकोळ विक्रेत्यांनाच नव्हे, तर घाऊक विक्रेते आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनाही या मालाचा साठा तात्काळ थांबवण्याचे आणि उर्वरित साठा एफडीए कार्यालयात सादर करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना ती अधिकृत दुकानदारांकडूनच आणि उत्पादनावर सर्व माहिती असल्याची खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याशी तडजोड न करता या घातक क्रीम्सचा वापर त्वरित थांबवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Mumbai Rain: मुंबईकरांनो लक्ष द्या! वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, समुद्रही खवळणार; BMCचं मोठं आवाहन
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world