शुभम बायस्कार, अमरावती
राज्यात सध्या महायुतीतूनच सरकारला अडचणीत आणण्याचे विविधांगी प्रयोग सुरू आहेत. असं वातावरण असतानाच अमरावतीत शिंदे गटाच्या नेत्यान पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलं आहे. महिला मुलींना मोफत बंदूक देण्याचा पहिला प्रयोग अमरावतीत करणार असून सरकारनं त्यासाठी आपल्याला परवानगी द्यावी, असं वक्तव्य मूर्तीजापुरचे माजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी यांनी केलं आहे.
शिंदे गटाचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत कलह माजलेला असतानाच नेभनानी यांनी केलेल्या या विधानामुळे शिंदे गटाची अडचण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात अमरावतीत 25 ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चाला मार्गदर्शन करताना मूर्तीजापुरचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना बंदूक वापरण्याची परवानगी द्यावी. मी स्वतः महिलांना माझ्यातर्फे पिस्तूल घेऊन देईल. महिलांनी स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर वापरावी, यात दोन-चार चांगली माणसे मेली तरी हरकत नाही. पण वाईट लोक वाचली नाही पाहिजे. याची जबाबदारी मी घेऊन कोर्टकचेरीचा खर्चही करायला तयार असल्याचं म्हणत नेभनानी यांनी खळबळ उडून दिली होती.
त्याच नेभनानी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वस्वरक्षणासाठी महिलांना मोफत बंदूक देण्याचा पहिला प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर अमरावतीत करणार असल्याचे नेभनानी यांनी जाहीर केलं. त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. महिला व मुलींना मोफत बंदूक देण्याच्या माझ्या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे, असेही त्यांनी स्पष्ठ केले.
अमरावती विधानसभेतून मोठा जनाधार
अमरावती विधानसभेतून शिवसेना शिंदे गटातर्फे आपल्याला उमेदवारी मिळणार असल्याचा दावा देखील नानकराम नेभनानी यांनी केला आहे. सर्व समाज घटकातून त्यासाठी मोठे समर्थन मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पाठीशी असून घटक पक्षातील तीनही पक्षांना आपली उमेदवारी मान्य आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आपण मैदानात उतरणार असून त्यात यशही मिळेल असेही त्यांनी नमूद केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world