
मनीष रक्षमवार, गडचिरोली
Gadchiroli News: बैलपोळ्याच्या सणासाठी आश्रमशाळेतून सुट्टीवर आलेल्या 5 वर्षीय लहानग्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील कोयार गावात ही दु:खद घटना घडली आहे. रिशान प्रकाश पुंगाटी असं मृत मुलाचं नाव आहे. तो लाहेरी येथील आश्रम शाळेतील पहिल्या इयत्तेत शिकत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी वडील प्रकाश पुंगाटी यांनी रिशानला लाहेरी येथील आश्रमशाळेतून घरी आणले होते. रिशान घरी आल्यावर लगेचच गावाजवळ असलेल्या नाल्यात अंघोळ करण्यासाठी गेला. त्याच वेळी ही दुर्दैवी घटना घडली. नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
(नक्की वाचा - Beed News: मैत्रिणीच्या घरी राहायला गेली अन् घात झाला? महिला होमगार्डची निर्घृण हत्या)
काही वेळाने गावकऱ्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. त्यानंतर महसूल प्रशासन आणि गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान रिशानचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आला.
(नक्की वाचा- खिशातील नोटांमुळे टीबीसारख्या अनेक गंभीर आजाराचा धोका; रीसर्चमधून धक्कादायक माहिती उघड)
या घटनेमुळे संपूर्ण कोयार गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. रिशानच्या अचानक मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका सणाच्या आनंदाच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने सर्वजण शोकाकुल झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world