
राज्यातील मागास तसंच नक्षल प्रभावित जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख आहे. त्यामुळेच या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलंय. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून या जिल्ह्यात विकासकामं सुरु होत आहेत. पण, त्याचवेळी गडचिरोलीच्या आश्रमशाळांमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या आश्रमशाळेतील 4 हजार 710 विद्यार्थ्यांपैकी 309 विद्यार्थ्यांमध्ये तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं आढळली आहेत. राज्य सरकारनंच ही माहिती विधान परिषदेत दिली आहे. त्यामुळे कधीकाळी लहान मुलांच्या कुपोषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीमध्ये लहान मुलांमधील व्यसनाधिनता हा मोठा प्रश्न बनला आहे.
राज्य सरकारनं काय सांगितलं?
गडचिरोली जिल्ह्यातील एकुण 4 हजार 710 आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यापैकी 309 विद्यार्थ्यांमध्ये कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं आहेत. विधान परिषदेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ही माहिती दिली. यापैकी 12 मुलांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे याच तपासणीत 676 विद्यार्थी तंबाखूच्या आहारी गेलेले आहेत अशी माहिती आदिवासी विकास मंत्र्यांनी दिली आहे.
(नक्की वाचा : Akola: अकोल्यात ड्रग्जचं जाळं विणणारा 'गब्बर' फरार, पोलिसांवर पैसे उधळणाऱ्या आरोपीचा 'आका' कोण? )
गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात आश्रमशाळा हीच मुलांसाठी शिक्षण आणि निवासाचं ठिकाण आहे. पण आता तिथं कॅन्सरचा धोका थेट दारात उभा ठाकला आहे.
राज्य सरकारच्या आकड्यांपेक्षा शास्त्रीय अभ्यासातील चित्र आणखी भयावह आहे. नागपूरच्या सरकारी दंत महाविद्यालयाने 6 जिल्ह्यांतील सर्व आश्रमशाळांत तपासणी केली. या अभ्यासात तब्बल 3,553 मुलांमध्ये कॅन्सरपूर्व लक्षणं आढळली. त्यामधील 80 टक्के विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यातील आहेत.
सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती गंभीर!
या मुलांना लहान वयातच तंबाखूची सवय लागलेली आहे. मुलांचे आईवडीलही तंबाखू सेवन करतात, त्यामुळे सवय लवकर लागते. आश्रमशाळेतील एकूण 23 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी सुमारे 12 हजार मुलं तंबाखू खाणारे आहेत असे हा अभ्यास सांगतो.
आदिवासीबहुल गडचिरोलीमध्ये तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण अधिक आहे. आई-वडिल तंबाखू खात असल्यानं त्यांच्या मुलांनाही ती सहज मिळते. त्यामुळे मुलांना सवय लागते. त्याचबरोबर दुपत्ता संकलन आणि विडी तयार करण्याचे काम गडचिरोली परिसरात होत असल्यान लहान मुलांना तंबाखू सहज उपलब्ध आहे. या मुलांना लवकर उपचार झाले तर त्यांचे आयुष्य वाढू शकते, असं मत कॅन्सर तज्ज्ञ डॉ. नितीन बोमनवार यांनी दिली.
गावोगाव तंबाखू सहज मिळते. पालकही मुलांना तंबाखू देतात. लहानपणी लागलेली सवय पुढे कॅन्सरमध्ये रूपांतरित होते असे या मुलांवर उपचार करणारे डॉक्टर सुशांत इखर यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या तज्ज्ञांनी आता AI बेस्ड अॅप तयार केलंय, त्यात तोंडाचे विविध फोटो टाकले की कॅन्सरची शक्यता कळते. असं नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टर नीता राजवर यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world