
मनीष रक्षमवार, गडचिरोली
नक्षल चळवळीच्या इतिहासातील सर्वात मोठं समर्पण भुपती आणि त्याच्या साथिदारांच्या रुपाने समोर आलं आहे. नक्षल कॅडरचा मोठा नेता आणि कुख्यात नक्षली भूपती उर्फ सोनू याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याच्या या निर्णयामागे त्याचे 40 वर्षांचे प्रेम आणि पत्नी तारक्का हिचे आर्त आवाहन आहे, असे बोलले जात आहे.
भुपती आणि तारक्काच्या प्रेमकथेची सुरुवात 1986 मध्ये झाली होती. गडचिरोली जिल्ह्यातील किष्टापूर येथील एका सामान्य कुटुंबातील तरुण युवती विमला उर्फ तारक्का हिने त्या वेळी नक्षल चळवळीत प्रवेश केला. याच दरम्यान तिची भेट मूळचा तेलंगणाचा आणि गडचिरोलीत सक्रिय असलेल्या नक्षल कमांडर भूपती याच्यासोबत झाली.
नक्षल चळवळीत काम करत असताना भूपती आणि विमला हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी विवाह केला. लग्नाच्या वेळी विमलाचे वय अवघे 17 वर्षे होते. भूपतीसोबत लग्न झाल्यानंतर विमला हळूहळू तारक्का दीदी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि ती दंडकारण्यात झोनल समिती सदस्य पदावर कार्यरत झाली.
तारक्काने दाखवला मुख्य प्रवाहाचा मार्ग
नक्षल चळवळीत सक्रिय असताना तारक्कावर तब्बल 66 गुन्हे दाखल होते आणि पोलिसांनी तिच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणांमुळे तारक्काने यावर्षी 1 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपले शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण केले आणि मुख्य प्रवाहात परतली.
मागील काही वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रिय असलेल्या भूपतीवरही अनेक गुन्हे दाखल होते आणि तो पॉलीत ब्युरो सदस्य म्हणून कार्यरत होता. पत्नी तारक्काने शस्त्र खाली ठेवल्यानंतर, तिने वेळोवेळी भूपती उर्फ सोनूला देखील मुख्य प्रवाहात परत येण्याचे आणि पोलिसांसमोर शरण जाण्याचे भावनिक आवाहन केले होते. तारक्काचे तब्बल 40 वर्षांचे प्रेम आणि तिची आर्त हाक विसरणे भूपतीला शक्य नव्हते. पत्नीच्या याच प्रेमाच्या हाकेला प्रतिसाद देत भूपतीने आज 60 नक्षली साथीदारांसह पोलिसांसमोर शरणागती पत्करली असल्याचे बोलले जात आहे.
भूपतीचे हे आत्मसमर्पण नक्षल चळवळीच्या कठीण वाटेवर प्रेमाची ताकद किती मोठी असू शकते, हे दर्शवते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्याने, आता भूपती आणि तारक्का या दोघांनाही समाजात सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. नक्षलवाद्यांना शांततेच्या मार्गावर आणण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि सी-60 दलाने राबवलेल्या प्रभावी धोरणाचे हे मोठे यश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world