मंगेश जोशी, जळगाव
जळगावमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांचे शिलेदार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पराभव झाल्यानंतर सत्तेत सहभागी होण्यासाठी गुलाबराव देवकर यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शरद पवार गटाला हा मोठा मानला जात आहे.
गुलाबराव देवकर यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती स्वतः गुलाबराव देवकर यांनी दिली. सोमवारी अजित पवारांची भेट घेणार असल्याची माहिती देखील गुलाबराव देवकरांनी दिली आहे.
(नक्की वाचा- 'कुणी संस्कृतमध्ये तर कुणी अल्लाह साक्ष....,' 'या' आमदारांचा शपथविधी ठरला खास!)
राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर जाण्याचा सूर हा कार्यकर्त्यांचा असल्याचं गुलाबराव देवकर यांनी सांगितलं. दहा वर्षापासून विरोधात असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मत कार्यकर्त्यांनी मांडलं. त्यामुळे आपण सत्तेची साथ दिली पाहिजे ही कार्यकर्त्यांची भावना असल्याने याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी आपण पक्षात येण्याबाबत चर्चा केली. अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाबाबत शरद पवारांशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचंही गुलाबराव देवकर यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- Maratha Reservation : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टीमेटम)
कोण आहेत गुलाबराव देवकर?
- गुलाबराव देवकर मे 1999 ते डिसेंबर 1999 या सहा महिन्यांच्या कालावधीत जळगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष.
- 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड.
- 2009 मध्ये जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी.
- 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचा पराभव करत गुलाबराव देवकर विजयी.
- विधानसभेत पहिल्यांदाच विजयी झाल्यानंतर राज्यमंत्रीपद आणि जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी.
- 2014 मध्ये जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटलांकडून देवकरांचा पराभव.
- 2024 च्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटलांकडून पुन्हा पराभव.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world