लक्ष्मण सोळुंके, जालना
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या मागणीसह हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्यासाठी एक महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे. या एक महिन्यात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मोठं आंदोलन उभं करू, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
राज्यातील नव्या सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आणि राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
(नक्की वाचा- एकनाथ शिंदेंचं मन फडणवीसांनी कस वळवलं? पडद्यामागे काय घडलं? NDTV मराठी Exclusive)
मनोज जरांगे यांनी नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा देत 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून द्या, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा. तसेच राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जास्त मस्तीत आणि गुर्मीत जगायचं नाही. आमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
जरांगे यांच्या आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीत मात्र जरांगे यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, त्यामुळे महायुतीला फायदा झाला.विधानसभा निवडणुक संपली असली तरी राज्यात अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. अजूनही मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात जरांगे यांच्यामागे मराठा समाजाचं पाठबळ टिकून आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाचा रोष सरकारला परवडणारा नाही.
(नक्की वाचा- MLA Swearing in Ceremony LIVE updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी, सभागृहात 'जय श्री राम'च्या घोषणा)
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा अवधी दिला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता फडणवीस सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काय भूमिका घेत हे देखील पाहणं महत्वाचं असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world