देवा राखुंडे
यंदाच्या पावसाळ्यात, पावसाने विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढलं होतं. अतिवृष्टी, ढगफुटीप्रमाणे झालेल्या पावसामुळे सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले. या नुकसानीचे भयावह रूप आता दिसू लागले आहे. पुरंदरमधल्या एका शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेला कांदा विकून त्याच्या हातात आलेली रक्कम ऐकून त्याला काय करावं हेच कळेनासं झालं आहे. पुरंदर येथील सुदाम इंगळे नावाच्या शेतकऱ्याने 750 किलो कांदा विकण्यासाठी नेला होता, त्याचा हाती फक्त 664 रुपये आले. म्हणजे एका किलोला त्याला किलोला 1 रुपये 12 पैसे भाव मिळाला. पावसामुळे कांदा खराब झाल्याने दर पडले आणि त्याचा फटका सुदाम यांच्यासारख्या शेतकऱ्यांना बसला आहे. सुदाम यांनी सांगितले की त्यांनी कांद्याचे पीक घेण्यासाठी यंदा 60 हजाराहून अधिक खर्च केला होता, पण सततच्या पावसामुळे बहुतेक उत्पादन वाया गेले. त्यांनी काही भाग वाचवला आणि तो पॅक करून पुण्यातील मार्केट यार्डात शुक्रवारी विक्रीसाठी पाठवला. मार्केट यार्डात पाठवण्यासाठी त्यांनी आणखी 1,500 रुपये खर्च केले होते. इतका खर्च केल्यानंतर इंगळे यांच्या हाती आले फक्त 664 रूपये.
नक्की वाचा: हापूस आला! पहिल्यांदाच घडलं, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आंबा वाशी मार्केटमध्ये दाखल
66 हजारांच्या बदल्यात मिळाले फक्त 664 रुपये
सुदाम इंगळे यांनी त्यांच्या दीड एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना लागवडी पासून आतापर्यंत 60 ते 65 हजार रुपये खर्च आला होता. स्वतःच्या पावसाच्या माऱ्यामुळे शेतातच कांद्याचे पीक सडलं. त्यातूनही काही कांदा बचावला गेला. तो काढणी पश्चात बाजारात पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला मात्र त्यालाही कवडी मोल किंमत मिळाली. इंगळे यांनी गुलटेकडी येथील कृष्णा रामचंद्र दुर्गे यांच्या आडतीवर 393 किलो कांदे 3 रुपये प्रति किलो दराने तर 202 किलो कांदे 2 रुपये आणि 146 किलो 10 रुपये दराने विक्री केले.यातून त्यांना एकूण 1 हजार 729 रूपये आले.यातून 1065 रुपये वाहतूक,हमाली वीज केल्यानंतर त्यांना 664 रुपये निव्वळ रक्कम हाती आली.
पंचनामे करण्याची विनंती
याबाबत सुदाम इंगळे यांनी सांगितलं की, मी अल्पभूधारक शेतकरी आहे, आमचं गाव खरिपाचं गाव आहे. नदीला किंवा विहिरीला आठमाही पाणी असतं. सिंचनाची फार मोठी सोय नाही. या थोड्याशा पाण्यावर खरिपाचं पीक घ्यावं म्हणून आम्ही कांद्याची लागवड केली होती. दीड एकर क्षेत्रावर मी कांदा लावला होता, कांद्याचं हे पीक जोमात आलं. इतकं सुंदर होतं की त्याला दृष्ट लागेल असं वाटायचं आणि तसंच झालं. या दीड एकरात जवळपास दोन ट्रक कांदा निघाला असता. परंतु हा सर्व कांदा आम्ही गाडून टाकला. इंगळे यांनी म्हटले की, आज शेतकरी अडचणीत आहे. सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. या कांद्याचे पंचनामे करा म्हणून मी अधिकाऱ्यांना विनंती केली. परंतु आपल्याकडे अतिवृष्टी झाली नाही, त्यामुळे पंचनाम्याचे आपल्या जिल्ह्याला आदेश नाहीत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंगळे पुढे म्हणाले की, दिवाळीत आणि दसऱ्यात शेतकऱ्याला पैसे मिळतात. यंदा कांद्याचं पीक हातातून गेलं त्यामुळे आमची यंदाची दिवाळी अंधारात आहे. शेतकरी आज मरणाच्या यात्रा सहन करतोय पुढारी मात्र निवडणुकीच्या नादाला लागले आहेत, असे संतप्त उद्गार इंगळे यांनी काढलेत.
नक्की वाचा: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर
मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
सुदाम यांनी NDTV मराठीशी बोलताना म्हटले की, आज परिस्थिती अशी आहे की, कोणी शेतकऱ्याकडे बघायला तयार नाही. शेतीमालाला बाजार भाव नाही, दीड एकर मी कांदा घेतला. अतिवृष्टीच्या पावसामुळे त्यातील बराचसा कांदा सडला , उरलेला कांदा मजूर लावून कसातरी काढला. दुसऱ्या दिवशी पावसात तो पुन्हा भिजला. पंधरा-वीस पिशव्या कशातरी काढल्या लोक त्याला फुकट सुद्धा नेत नव्हती. इंगळे म्हटले की मी हे नुकसान सहन करू शकतो मात्र सर्व शेतकरी ते सहन करू शकत नाहीत. अनेक शेतकरी रडत आहेत त्यांची काळी दिवाळी चालली आहे. काय करायचं ते करा, शेतकऱ्याचे पंचनामे करा आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या अशी कळकळीची विनंती देवा भाऊ तुम्हाला करतो असं इंगळे यांनी म्हटलं आहे.