जाहिरात
This Article is From Apr 16, 2024

पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी;  16 वर्षांच्या अश्विनीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असून पालघर, मुरबाड, ठाणे, रायगड या जिल्हातील पारा चाळीशी पार गेला आहे. 15 एप्रिल रोजी मुरबाडमधील तापमान सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं.

पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी;  16 वर्षांच्या अश्विनीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात
पालघर:

प्रतिनिधी, मनोज सातवी

राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असून पालघर, मुरबाड, ठाणे, रायगड या जिल्हातील पारा चाळीशी पार गेला आहे. 15 एप्रिल रोजी मुरबाडमधील तापमान सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थिनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या केव (वेडगेपाडा) येथे राहत होती. अश्विनी विनोद रावते असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती 16 वर्षांची होती. अश्विनी एस.पी.मराठे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज मनोर येथे अकरावीच्या वर्गात शिकत होती.

11 वीच्या परीक्षेचा पेपर देऊन सोमवारी अश्विनी घरी आली. परंतु घरी कोणी नसल्यामुळे ती आई वडिलांना शोधण्यासाठी शेतावर गेली. मात्र आई शेतावरून कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती आणि वडील मनोर येथे बाजारात गेले होते. अश्विनी शेतावर गेली असता तिथेच तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोसळली. दुपारच्या सुमारास शेतात कोणीच नसल्यामुळे तब्बल दोन तास अश्विनी उन्हातच पडून होती. त्यानंतर आई घरी आल्यानंतर अश्विनीची कॉलेजची बॅग दिसली.

मात्र अश्विनी कुठे दिसत नाही हे पाहून अश्विनीची आई तिला शोधण्यासाठी पुन्हा शेतावर गेली. तेव्हा अश्विनी बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं दिसून आलं. त्यानंतर अश्विनीला तत्काळ मनोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अश्विनीच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून विक्रमगड तालुक्यामध्ये सोमवारी 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर आज त्यात वाढ होऊन 42 अंश सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com