स्वानंद पाटील, बीड
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये,या मागणीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा. लक्ष्मण हाके अंतरवाली फाट्यावर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. ओबीसी कार्यकर्त्यांनी हाके यांना भेटण्यासाठी गर्दी केली. दुसरीकडे बीडमधील हातोला गावातने हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. संपूर्ण गावच उपोषणाला बसलं आहे. परिसरातील 25 गावच्या सरपंचांनी ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाला उपस्थिती दर्शवली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आष्टी तालुक्यातील हातोला या गावात हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून संपूर्ण गावच उपोषणाला बसले आहे. मंगळवारी हातोला परिसरातील 25 गावचे सरपंच या उपोषणात सहभागी झाले आहेत. या उपोषणकर्त्यांची ओबीसीमधून कोणालाही आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी आहे.
(नक्की वाचा- इंदापूरची जागा वाढवणार महायुतीची डोकेदुखी, पवार-फडणवीस कसा सोडवणार तिढा?)
राज्य सरकार जो पर्यंत ओबीसीमधून आरक्षण न देण्याबाबत लेखी देत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा निर्धार हातोला ग्रामस्थांनी केला आहे. याआधी सोमवारी हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातून 400 हून अधिक गाड्या वडीगोद्रीत दाखल झाल्या होत्या. यामध्ये शिरूर तालुक्यातून तब्बल 200 हून अधिक गाड्या आल्या होत्या. याबरोबरच हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसींच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत.
पंकजा मुंडे-धनंजय मुंडे भेटीला
लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाबद्दल पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत सरकारला हाकेंच्या उपोषणाकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलकांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे. यानंतर सोमवारी रात्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी वडीगोद्री येथे जाऊन हाके यांची भेट घेतली होती.
( नक्की वाचा : 'गरज सरो, वैद्य मरो!' प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंवर का भडकले? )
भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलं की, सरकारने हाके यांचं उपोषण सोडवलं पाहिजे. आष्टीतून ओबीसी समाज जास्त असल्याने आमच्या भागातील युवक हे वडीगोद्री येथे गेले आहेत. आरक्षणाच्या बाबतीत दोन्ही बाजू ऐकून दोघांना समोरासमोर बसवून सरकारने मार्ग काढला पाहिजे.